गोवेकरांना 1 फेब्रुवारीपासून कॅसिनोवर नो एण्ट्री, गेमिंग कमिशन स्थापन करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील मांडवी नदीतील तरंगत्या कॅसिनोंमध्ये जाण्यास येत्या 1 फेब्रुवारीपासून गोमंतकीयांना बंदी असणार आहे. सरकारने गेमिंग कमिशन स्थापन करण्याचे ठरवले आहे. त्याविषयीची अंमलबजावणी येत्या शनिवारपासून सुरू होणार आहे.

मांडवी नदीत पाच कॅसिनोंमध्ये देशविदेशातील पर्यटकांबरोबरच हजारो गोमंतकीयदेखील जात असतात. अनेकांची कुटुंबे कॅसिनोमुळे उद्ध्वस्त झाली आहेत. या पार्श्वभूमीवर गोमंतकीयांना कॅसिनोंमध्ये जाण्यास बंदी लागू करावी अशी मागणी लोकांबरोबरच आमदार व काही मंत्र्यांकडून केली जात होती.

कळंगुट मतदारसंघाचे आमदार तथा बंदर कप्तान खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय उपस्थित केला होता. मांडवी नदीतून कॅसिनो हटविले जावेत अशी मागणीही होत होती, मात्र सरकार तूर्त गोमंतकीयांना बंदी लागू करण्याच्याच विषयावर लक्ष देईल असे सूत्रांनी सांगितले.

वाणिज्य कर आयुक्तांवर जबाबदारी

हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमात आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याची अधिकृत घोषणा केली. गोव्याचे वाणिज्य कर आयुक्त हेच गेमिंग कमिशनर म्हणून काम पाहतील. आपण त्याविषयीच्या फाइलवर प्रक्रिया सुरू केली आहे. गोमंतकीयांना कॅसिनोंमध्ये जाण्यापासून बंदी लागू होईल. 1 फेब्रुवारीपासून बंदीची अंमलबजावणी गेमिंग कमिशनर करून घेतील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. कॅसिनोंमध्ये जे कुणी जातील त्यांचे ओळखपत्र मागण्याचा अधिकार हा गेमिंग कमिशनरला असेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.