
चीनमध्ये हाहाकार माजवणाऱ्या ‘कोरोना’ व्हायरसने हिंदुस्थानात शिरकाव केला असून केरळमध्ये चीनहून परतलेल्या एका विद्यार्थ्याला या विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, चीनमध्ये 27 हिंदुस्थानी विद्यार्थी अडकले असून त्यात महाराष्ट्रातील सातजणांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना हिंदुस्थानात परत आणण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याकडे ट्विटरद्वारे विनंती केली आहे.
चीनमध्ये कोरोना व्हायरसने आतापर्यंत 180 बळी घेतले असून तब्बल 13 शहरे बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. या व्हायरसचा जगभरात प्रसार होण्याच्या घटना घडत असतानाच फ्रान्समध्ये पाच तर हिंदुस्थानात एकजण पॉझिटिव्ह सापडला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पथक महाराष्ट्रात येणार
कोरोना विषाणूचा अधिक फैलाव होऊ नये यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून केंद्र व राज्याच्या आरोग्य विभागाकडून दक्षता घेण्यात येत आहे. आरोग्य यंत्रणा अधिकच सतर्क झाली असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पथक यासंदर्भातील आढावा घेण्यासाठी महाराष्ट्रात दाखल होणार आहे.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी 1029 कोटींचे दान
कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेले मृत्यूचे तांडव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करता याव्यात म्हणून चीनमधील सर्वात श्रीमंत ‘अलिबाबा’चे संस्थापक जैक मा यांनी 1029 कोटी रुपये (14 मिलियन डॉलर) दान दिले आहेत. 5.8 मिलियन डॉलरची रक्कम ही दोन रिसर्च संस्थांना देण्यात आली आहे. याशिवाय कोरोना विषाणूची लागण झालेल्यांच्या उपचाराचा खर्चही त्यांच्याकडून केला जाणार आहे. जॉन्सन ऍण्ड जॉन्सनने लवकरच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणारे औषध निर्माण करण्यात येईल असा दावा केला आहे. यासाठी जॉन्सन ऍण्ड जॉन्सनच्या 12 वैद्यकीय शास्त्रज्ञांची टीम काम करत असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मुंबईत ऍलर्ट; कस्तुरबात तीन संशयित रुग्ण
केरळात ‘कोरोना’चा रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही ऍलर्ट जारी करण्यात आला आहे. कस्तुरबा रुग्णालयात तीन संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले असून आतापर्यंत आठजणांचे वैद्यकीय चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे पुण्यातील एनआयव्ही संस्थेने कळवले आहे.
- चीनमध्ये अडकलेले विद्यार्थी हुवान शहरापासून 90 किमी अंतरावरील सियानीगमधील हुबे युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजीमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. महाराष्ट्रातील सात विद्यार्थ्यांमध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड, लातूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेडमधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.


























































