
उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सने (यूपीएसटीएफ) गोरखपूरचा डॉक्टर काफिल खान याला बुधवारी रात्री मुंबई विमानतळावरून अटक केली. त्याच्यावर अलिगढ मुस्लिम विद्यापीठात सीएएविरोधात भडकाऊ भाषण केल्याचा आरोप आहे. काफिल हा गुरुवारी मुंबईत होणाऱया सीएएविराधी आंदोलनात सहभागी होणार होता. त्याआधीच यूपीएसटीएफने मुंबई पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले.
गेल्या वर्षी 12 डिसेंबरला अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराबाहेर जवळपास 600 विद्यार्थ्यांपुढे काफिल खानने सीएएविरोधात भडकाऊ भाषण केले होते. याप्रकरणी दुसऱयाच दिवशी अलिगढच्या सिव्हील लाईन्स पोलीस ठाण्यात काफिलविरोधात कलम 153 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर बुधवारी मुंबई विमानतळावरून त्याला अटक करण्यात आली. त्याने गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधातही आक्षेपार्ह विधान केले होते, असे पोलिसांनी सांगितले.






























































