रस्त्यावर खड्डे दिसल्यास कंत्राटदाराचे पेमेंट रोखणार, दर्जेदार रस्त्यांसाठी पालिकेचा कठोर निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रस्त्याचे काम झाल्यानंतर देखभाल-दुरुस्तीच्या ‘हमी कालावधी’त रस्त्यावर खड्डे दिसल्यास संबंधित कंत्राटदाराचे पेमेंट रोखण्याचा कठोर निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी आज ही माहिती दिली. यामुळे रस्त्याचे काम झाल्यानंतर देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणाऱया कंत्राटदारांना आता त्यांचा बेजबाबदारपणा चांगलाच महागात पडणार असून मुंबईकरांना दर्जेदार रस्ते मिळणार आहेत.

मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून दरवर्षी शेकडो रस्त्यांची कामे केली जातात. यामध्ये जानेवारीत आतापर्यंत सुमारे 500 रोड आणि उड्डाणपूल-पादचारी पुलांची कामे सुरू करण्याचे प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर करण्यात आले आहेत. पावसाळ्याआधी या रस्त्यांची कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाने संबंधित कंत्राटदारांना दिले आहेत. दरम्यान, रस्त्यांच्या स्थितीबाबत स्थायी समितीत सदस्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केल्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला तातडीने रस्त्यांची सद्यस्थिती स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी आपण 50 हून जास्त कंत्राटदारांची बैठक घेऊन दर्जेदार काम करण्याचे निर्देश दिल्याची महिती दिली. हमी कालावधी (डीएलपी-डिफेक्ट लायबेलिटी पिरीएड) मध्ये रस्त्यांची देखभाल करण्याकडे कंत्राटदार दुर्लक्ष करतात. यामुळे रस्ते खराब झाल्याचा नाहक त्रास मुंबईकर, प्रवासी, वाहनचालकांना होतो. त्यामुळे निकृष्ट काम, रस्त्यावर खड्डे आढळल्यास त्यांचे पेमेंट रोखण्याचा इशाराही यावेळी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पावसाळय़ासाठी यंत्रणा तयार ठेवण्याचे आदेश
पावसाळ्याआधी होणाऱया कामांमध्ये रस्ते दर्जेदार दिसत असले तरी निकृष्ट कामामुळे पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडतात. कंत्राटदारांच्या निकृष्ट कामामुळेच ही परिस्थिती ओढवत असून पालिकेची नाहक बदनामी होत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. यामुळे मुंबईकरांना होणारा मनस्ताप थांबावा म्हणून पावसाळ्यासाठी कंत्राटदारांनी यंत्रणा तयार ठेवावी असे निर्देशही पालिकेने दिले आहेत.
रस्त्याचा दर्जा राखला जावा यासाठी 20 ते 40 टक्क्यांपर्यंतची रक्कम हमी कालावधीपर्यंत बाकी ठेवण्यात येत आहे.