जालन्यात प्रेमीयुगुलाला चौघांकडून बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना तालुक्यातील गोंदेगाव शिवारात असलेल्या तलावावर फिरण्यास आलेल्या प्रेमीयुगुलाला चौघांनी बेदम मारहाण केली. तसेच तरुणीची छेडछाड करुन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याचा व्हिडीओही आरोपींनी व्हायरल केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोंदेगाव परिसरातील ही घटना आहे. बुलडाणा जिल्ह्यातील तरुण आणि तरुणी गोंदेगावात फिरायला आले होते. यावेळी तळ्याच्या दिशेने जाणाऱ्या दोघांना गावगुंडांनी गाठले आणि धमकावायला सुरुवात केली. प्रेमीयुगुलाने आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही, फक्त फिरायला आल्याचे सांगितले. मात्र गावगुडांनी त्यांचे काहीही ऐकूण न घेता बेदम मारहाण केली आणि तरुणीचा विनयभंग केला.

विशेष म्हणजे या गावगुडांनी प्रेमीयुगुलाला मारहाण करतानाचा व्हिडीओ बनवून व्हायरल केला. व्हिडीओमध्ये गावगुंड तरुणीची कॉलर पकडून तिला फरपटत नेताना दिसत आहे. सोबतचा तरुण ‘कृपया तिला सोडा, आम्ही परत येणार नाही’ अशा शब्दात गयावया करत आहे. मात्र तरुणाचे काहीही ऐकूण न घेता गावगुंड मारहाण करत राहतात.

गृहमंत्र्यांनी घेतली दखल
दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या घटनेची दखल घेतली असून आरोपींवर लवकरात लवकर कडक कारवाई होईल असे सांगितले. जालन्यात घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. याचा व्हिडिओ व्हायरल होत होता, त्याला थांबवण्याचे आदेश दिले गेलेले आहे, असे ट्वीट अनिल देशमुख यांनी केले आहे.