
संसदेत आज सादर झालेल्या अर्थसंकल्पामुळे शेअर बाजराची सपशेल निराशा झाली. त्यामुळे बाजारात विक्रीला तेजी आली. गुतंवणूकदारांनी आपले पैसे काढून घेतल्याने बाजारात मोठी घसरण झाली. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक एक हजार अंकांनी घसरला. तर राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजे निफ्टीच्या निर्देशांकात 319 अंकांची घसरण झाली. शेअर बाजार कोसळल्याने गुंतवणूकदारांचे चार लाख कोटींचे नुकसान झाले आहे. अर्थसंकल्पामुळे शेअर बाजाराची निराशा झाली असल्याचे दिसून आले आहे.
गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पातील कररचना कायम राहणार असून नवीन कररचना निवडण्याचा पर्याय सरकारने करदात्यांना दिला आहे. मात्र, नव्या कररचनेत कर कमी करण्यात आला असला तरी यात करदात्याचे एकूण उत्पन्न ग्राह्य धरले जाणार आहे. तसेच याअंतर्गत विवरण सादर करताना करात सूट मिळणार नाही. या घोषणेचे बाजारात नकारात्मक पडसाद उमटले. त्यामुळे बचत आणि गुंतवणुकीवर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. औद्योगिक क्षेत्र मंदीशी सामना करता असताना अर्थसंकल्पात काहीच ठोस हाती न लागल्याने उद्योजकांमध्येही नाराजीचे वातावरण आहे. अर्थसंकल्पात औद्योगिक क्षेत्राला प्रोत्साहन देणाऱ्या घोषणांची अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नसल्याने बाजारात नाराजी दिसून आली. गेल्या वर्षी अर्थसंकल्पात 1.05 लाख कोटींचे निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट सरकारने ठेवले होते. मात्र ते साध्य झाले नाही. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षासाठी निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट दुपटीने वाढवण्यात आले. पुढील आर्थिक वर्षासाठी 2.10 लाख कोटींचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. मात्र ते कसे पूर्ण होणार याबाबत गुंतवणूकदारांमध्ये चिंता आहे. त्याचा परिणामही बाजारात दिसून आला.
यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी लाभांश वितरणकर रद्द केला आहे. मात्र, कररचना बदल्यामुळे करदात्यासाठी लाभांश उत्पन्न करपात्र असेल. नव्या कररचनेनुसार त्याने करविवरण सादर केले. तर त्याला लाभांशावर जादा कर द्यावा लागेल. याचा शेअर गुंतवणूकदारांनी धसका घेतला आणि विक्रीला सुरुवात केल्याने बाजार कोसळला. अर्थसंकल्पात दीर्घकालीन भांडवली नफा करात (एलटीसीजी) कोणताही बदल न झाल्याने म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांची घोर निराशा झाली. त्याचे पडसाद शेअर बाजारावर उमटले. निराश झालेल्या गुंतवणूकदारांनी बाजारात चौफेर विक्री केली. यंदा केंद्र सरकारकडून दीर्घकालीन भांडवली नफा करात ( एलटीसीजी) कपात केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, तसे झाले नसल्याने गुंतवणूकदारांची निराशा झाली.




























































