
चीनमधील कोरोना विषाणूच्या वाढत्या धोक्यामुळे संपूर्ण जगभरात चीनविरोधी भावना वाढीस लागली आहे. काही देशांनी चीनच्या प्रवाशांवर प्रवेशबंदी घातली असून अनेक रेस्तराँमधून चिनी नागरिकांना अपमानित होऊन बाहेर पडावे लागत आहे. दरम्यान, चीनमधून येणाऱ्या नागरिकांना देण्यात येणारी ई-व्हिसाची सुविधा हिंदुस्थानने तूर्तास थांबवली आहे.
दक्षिण कोरिया, जपान, हाँगकाँग आणि व्हिएतनाममध्ये काही रेस्तराँमध्ये चीन ग्राहकांना दूरच ठेवले जात आहे. इंडोनेशियात तर स्थानिक नागरिकांनी एका हॉटेलवर मोर्चा काढून तेथील चिनी पर्यटकांना बाहेर काढण्यास भाग पाडले. व्हिएतनामपासून अमेरिकेपर्यंत सर्वच देश चिनी नागरिकांशी सुरक्षित अंतर ठेवत आहेत. चीनबाहेर जवळपास दोन डझन देशांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव झाला आहे. या विषाणूने आतापर्यंत 305 लोकांचा बळी घेतला असून हजारो लोकांना लागण झाली आहे.
इम्रान सरकारला लाज वाटली पाहिजे; पाकिस्तानी विद्यार्थ्यांचा आक्रोश
हिंदुस्थानने वुहानमध्ये फसलेल्या आपल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी विशेष विमानांची व्यवस्था केली. त्यानंतर लगेचच वुहानमधील पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून इम्रान सरकारवर जोरदार निशाणा साधला. पाकिस्तान सरकारने आम्हाला चीनमध्ये मरायलाच पाठवलेय का? इम्रान सरकारला लाज वाटली पाहिजे, जर हिंदुस्थानकडे बघा, असा आक्रोश या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.




























































