
वाहनांनाच्या क्षमतेपेक्षा अधिक माल वाहून नेणाऱया डंपरवर केलेल्या कारवाईचा सूड उगवण्यासाठी डंपरमाफियाने एका आरटीओ निरीक्षकावर त्याची गाडी रोखून प्राणघातक हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी दोघांना बेडय़ा ठोकल्या आहेत.
आरटीओ निरीक्षक मनोज पैठणकर यांनी तक्रार दिल्यानंतर ट्रॉम्बे पोलिसांनी गुन्हा दाखल करताच नितीन जगे या आरोपीने राजस्थानला पलायन केले होते पण तो ठाण्यात परतल्यावर त्याला आणि संजय नलावडे याला पोलिसांनी सापळा रचून शुक्रवारी अटक केली. त्यांचे दोन साथीदार फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.
या हल्लेखोरांनी 24 जानेवारीच्या रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ट्रॉम्बे-शीव रोडवर छत्रपती शिवाजी महाराज सर्कलजवळील इंडियन ऑइल पेट्रोलपंपासमोर नितीन जगे आणि त्याच्या तीन साथीदारांनी पैठणकर यांच्या शासकीय बोलेरो मोटार जीपच्या मार्गात दोन गाडय़ा घुसवून त्यांना रोखले आणि त्यांच्यावर हल्ला चढवला. आरटीओ निरीक्षकावर ऑनडय़ुटी अशाप्रकारे हल्ला झाल्याने परिवहन खात्यातील कर्मचारी संतापले असून आपल्या सुरक्षिततेबाबत ते चिंता व्यक्त करत आहेत.
हल्ला का केला?
वाहनांच्या क्षमतेपेक्षा अधिक माल वाहतूक केल्याबद्दल नितीन जगे आणि संजय नलावडे यांच्या डंपरवर आरटीओ निरीक्षक मनोज पैठणकर यांनी 14 जानेवारी आणि 24 जानेवारीला अशी दोनदा दंडात्मक कारवाई केली होती. याच सूडापोटी नितीन व संजय यांनी ऑनडय़ुटी असलेल्या पैठणकर यांच्यावर हल्ला चढवला.
उच्च न्यायालयाचे कारवाईचे आदेश
वाहनांच्या भार क्षमतेपेक्षा अधिक माल वाहतूक केल्याने अपघातांना निमंत्रण तर मिळतेच शिवाय प्रमाणाबाहेर वजनदार माल वाहतूक केल्याने रस्त्यांची दुर्दशा होऊन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते. त्याची गंभीर दखल घेऊन डंपरमाफियांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानेच दिले आहेत. त्यांची काटेकोर अंमलबजावणी आरटीओचे अधिकारी करत आहेत.


























































