घरफोडी करणार्‍या टोळीच्या मुसक्या आवळल्या; पाच आरोपींना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घरफोडी करणार्‍या टोळीच्या मुसक्या आवळण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. मुंब्रा आणि दहीसर या परिसरातून 5 जणांना पोलीसांनी अटक केली आहे. या पाचजणांनी राजापूर, सावर्डेसह कणकवलीत घरफोडी केल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलीसांनी दिली.

6 जानेवारी रोजी राजापूर येथील श्रीराम गॅस एजन्सीमध्ये अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून रोख रक्कम, लॅपटॉप आणि मोबाईल हॅण्डसेट चोरी केले होते. तसेच सावर्डे येथील स्वरा मोबाईल शॉपी फोडून पॉवर बँक आणि अन्य साहित्य लंपास केले होते. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे आणि अपर पोलीस अधिक्षक विशाल गायकंवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक शिरीष सासने यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस पथके तयार करुन तपास सुरु केला. मुंबईतील शीळ फाटा, मुंब्रा, दहिसर या परिसरात पोलीसांनी शोध सुरु केला. मुंब्रा आणि दहीसर या ठिकाणांहून पोलीसांनी महंमद इरफान कुददुस खान, रिझवान अहमद मकबूल खान, मुमताज मेहराज शेख, एजाज अली सफात अली सिध्दीकी आणि मुश्ताक महारुख खानयांना पोलीसांनी अटक केली. पोलीसांनी त्यांच्याकंडून चोरीचा मुददेमाल आणि गुन्ह्यामध्ये वापरलेली तवेरा गाडी असा एकूण 4 लाख 13 हजार 805 रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला आहे.