लंडनमध्ये दहशतवाद्याचा चाकूहल्ला, तीन जण गंभीर; हल्लेखोर पोलिसांच्या गोळीबारात ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण लंडनच्या स्ट्रेटम भागात रविवारी एका दहशतवाद्याने गर्दीवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हा हल्लेखोर दहशतवादी ठार झाला आहे. पोलिसांनी हा हल्ला दहशतवादाशी संबंधित असल्याचे म्हटले आहे. हल्लेखोर 20 वर्षीय असून सुदेश अमान अशी त्याची ओळख पटली आहे. गेल्या आठवडय़ातच त्याची कारागृहातून सुटका झाली होती.

मे 2018 मध्ये दहशतवादी कटात सहभागासाठी त्याला अटक करण्यात आली होती. नोव्हेंबर 2018 मध्ये त्याला 13 खटल्यांमध्ये आरोपी बनविण्यात आले होते. अमानला हे सर्व आरोप मान्य होते. त्याला येथील न्यायालयाने 3 वर्षे आणि 4 महिन्यांची शिक्षादेखील सुनावली होती. कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याने गर्दीवर हल्ला चढविला.

कारागृहातून सुटकेनंतरच्या नियमांत बदल करणार

पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी या घटनेनंतर दहशतवादाशी संबंधित खटल्यातून कारागृहातून सुटका झालेल्यांसाठी सुटकेनंतरच्या नियमात बदल करणार असल्याचे स्पष्ट केले. जॉनसन यांनी हेच विधान दोन महिन्यांपूर्वी लंडन ब्रिजवर झालेल्या चाकू हल्ल्याच्या घटनेनंतरही केले होते. दरम्यान, निवडणुका आणि ब्रेग्जिटमुळे ब्रिटिश संसदेत दहशतवाद्यांसाठी बनविण्यात येणाऱया कडक नियमांवर अद्याप चर्चा झालेली नाही.