मध्यान्ह भोजनावेळी भाजीच्या भांड्यात पडून चिमुरडीचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कानात इअरफोन घालून काम करणं हे कधी कधी अत्यंत धोकादायक असू शकतं. याचा प्रत्यय मिर्झापूरमध्ये घडलेल्या एका भयानक घटनेवरून आला आहे. उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर येथे शालेय मध्यान्ह भोजन शिजवताना एका तीन वर्षांच्या चिमुरडीचा भाजीच्या भांड्यात पडून मृत्यू झाला आहे. या घटनेवेळी भाजी शिजवणारी महिला कानात इअरफोन घालून गाणी ऐकत जेवण बनवत असल्याचं उघड झालं आहे.

मिर्झापूर येथील मध्यान्ह भोजनामुळे खळबळ माजण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही शालेय पोषण आहाराच्या नावाखाली मुलांना मिठासह रोट्या खायला दिल्या जात असल्याचं उघड झालं होतं. आता मिर्झापूर येथील रामपूर अतरी इथल्या प्राथमिक विद्यालयात ही घटना घडली आहे. आंचल असं या लहान मुलीचं नाव आहे. विद्यालयाचे मध्यान्ह भोजन बनत असताना स्वयंपाक करणारी महिला कानात इअरफोन घालून गाणी ऐकत होती. त्यामुळे शाळेत भावासोबत शिकणाऱ्या आणि त्यावेळी तिथेच खेळत असलेल्या आंचलकडे तिचं दुर्लक्ष झालं.

आंचल खेळता खेळता अचानक शिजत असलेल्या भाजीच्या भांड्यात पडली. पण, गाणी ऐकत असल्याने महिलेला तिचा आवाज ऐकू आला नाही. भाजीच्या भांड्यात पडल्याने आंचल होरपळली आणि बचावासाठी ओरडू लागली. आंचलचा आवाज ऐकून तिथे आलेल्या लोकांनी तिला भाजीच्या भांड्याबाहेर काढलं आणि ताबडतोब रुग्णालयात दाखल केलं. तिथे उपचारांदरम्यान तिची प्राणज्योत मालवली. या दरम्यान भोजन बनवणारी महिला मात्र आंचलची मदत करायची सोडून पळून गेली. या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांचं निलंबन केलं असून निष्काळजीपण करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.