कांद्याची आवक वाढली, दर घसरला; शेतकऱ्यांना फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
onion

देशांतर्गत बाजारपेठेत आवक वाढल्याने नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये आज लाल कांद्याच्या कमाल दरात 200 ते 600 रुपयांनी घट झाली, त्यामुळे कमाल दर 1926 ते 2600 रुपये प्रतीक्विंटल असा होता.

अनेक राज्यांमध्ये स्थानिक कांद्याचे उत्पादन वाढले आहे, त्यामुळे जानेवारी महिन्यात 4000 रुपये क्विंटलवर पोहचलेल्या कांद्याचा दर आता दिवसेंदिवस घसरत चालला आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत आज कमाल दर 200 ते 600 रुपयांनी घसरला. लासलगाव बाजार समितीत सर्वाधिक 21 हजार 300 क्विंटल आवक होती. मागील आठवड्यात शुक्रवारी येथे आवक निम्मी म्हणजे 10 हजार क्विंटल होती. येथे आज कमाल 2152, सरासरी 1800 आणि किमान 700 रुपये क्विंटल भाव होता. इतर सर्वच बाजार समित्यांमध्ये आवक वाढल्याने भावात घसरण झाली. सरासरी भाव 1500 ते 2100, किमान 500 ते 1400 रुपयांच्या घरात होता.

बाजार समित्यांमधील किमान, कमाल, सरासरी दर क्विंटलमध्ये पुढीलप्रमाणे :

सायखेडा- 1200-1926-1750,
मनमाड- 650-2000-1800,
अंदरसूल- 500-2000-1750,
नामपूर- 600-2100-1600,
उमराणे- 701-2150-1700,
पिंपळगाव- 1400-2300-2100.