
रोज हजारो उल्का अवकाशातून पृथ्वीकडे झेपावत असतात. चोवीस तास हा अवकाशी खेळ सुरू असतो. दिवसा पडणाऱया उल्का आपल्याला सूर्यतेजामुळे दिसत नाहीत. रात्रीच्या आकाशात, निरभ्र आणि अमावास्येजवळच्या काळात ‘उल्कावर्षाव’ प्रकर्षाने दिसतात. कोणत्या राशीच्या पार्श्वभूमीवर हा नयनमनोहर सोहळा दिसेल, त्याच्या तारखाही ठरलेल्या आहेत. त्यापैकी सिंह राशीतून होणारा उल्कावर्षाव नोव्हेंबरच्या मध्याला दिसतो. नेमक्या त्याचवेळी चंद्र आकाशात नसेल तर उत्तमच. काही उल्का छोटय़ा दगडगोटय़ांपेक्षा मोठय़ा असतात. त्या बहुतेक उल्कांप्रमाणे पृथ्वीच्या वातावरणाच्या घर्षणाने जळून खाक न होता थेट भूपृष्ठावर आदळतात आणि प्रसंगी उत्पात घडवतात. रशियातील तुंगुस्काच्या जंगलात 1910 मध्ये कोसळलेल्या अशनीने प्रचंड जंगल भस्मसात केलं. काही महापाषाणांनी पृथ्वीवर आतापर्यंत निर्माण केलेली विवरं कित्येक कोटी ते काही हजार वर्षांपूर्वीची आहेत. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी मेक्सिकोतील चिक्सलब येथे 10 ते 80 किलोमीटर व्यासाचा एक अशनी किंवा एक धूमकेतू आदळला. त्याने 150 किलोमीटर व्यासाचे एक प्रचंड विवर निर्माण केले. सध्या त्यातला अर्धा भाग समुद्रात व अर्धा जमिनीवर आहे आणि भूभागावरील विवरात चिक्सलब शहर वसले आहे.
अमेरिकेतील ऍरिझोना राज्यातील बॅरिंजर अशनी आघाती विवर प्रसिद्ध आहे. 1200 मीटर व्यासाचे आणि 170 मीटर खोली असलेले हे विवर वाळवंटात आहे. पन्नास हजार वर्षांपूर्वी आदळलेल्या एका महापाषाणाने ते निर्माण केले. तेथे उत्खन्न केल्यावर निकेल तसेच आयर्न (लोह) असलेला 50 मीटर व्यासाच्या धातुमय अशनीचे अवशेष आढळले. 1903 मध्ये डॅनिमल बॅरिंजर या इंजिनीअरने या विवरातील धातूंचा वापर करण्याचं कंत्राट घेतलं. तसा करार झाल्याने या विवराला ‘बॅरिंजर क्रेटर’ असं म्हटलं जाऊ लागलं.
हिंदुस्थानात सापडलेल्या तीन अशनी-आघाती विवरांपैकी सर्वात जुनं व मोठं शिवा क्रेटर गुजरातच्या किनाऱयापासून पश्चिम समुद्रात आहे. ते 1.7 ते 2.2 कोटी वर्षांपूर्वीचं असल्याचं म्हटलं जातं. मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्हय़ातील दाला येथे लोणारनंतर 11 कि.मी. व्यासाचं अशनी – आघाती विवर सापडलं. ते देशातील सर्वात मोठं ज्ञात विवर आहे. मात्र त्याच्या आधी आपल्या महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्हय़ात सापडलेलं लोणार येथील विवर देशातलं अग्निजन्य खडकात तयार झालेलं एकमेव अशनी-आघाती विवर आहे. उरलेली तीन ब्राझीलमध्ये आढळतात. लोणार विवरातील खाऱया पाण्याच्या सरोवराचा व्यास 1.5 कि.मी.आहे. 52 हजार वर्षांपूर्वी हायपरवेलॉसिटी इम्पॅक्टने ते तयार झाले. सध्या ऑस्ट्रेलियातील थेराबुब्वा विवराची चर्चा सुरू असून 2 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर आदळलेल्या अशनीने हे विवर निर्माण झाल्याचं मानलं जातं. त्याचं ‘वय’ लक्षात घेता ते पृथ्वीवरचं माणसाला ठाऊक असलेलं पहिलं अशनी आघात विवर आहे. या विवराचा व्यास 70 किलोमीटर असून मूळ विवराची पूर्ण झीज झाली आणि आता त्याने निर्माण केलेला बॅरलॅन्जी टॉक हा खडकाळ भाग पाहायला मिळतो. पश्चिम ऑस्ट्रेलियामधील पर्थ या प्रसिद्ध शहराला ते तुलनेने जवळ अहे.
ज्या काळात या ठिकाणी मोठा अशनी आदळला त्या काळात पृथ्वीवर हय़ुरोनिअन ग्लेसिएशन नावाचे हिमयुग सुरू होते. सर्व पृथ्वीचे बर्फाच्या गोळय़ात रूपांतर झाले होते. त्या काळात अवकाशातून हा अतिप्रचंड अशनी पृथ्वीवर एवढय़ा जोरात आदळला की, त्याने निर्माण केलेल्या आघाती ऊर्जेने फार मोठय़ा प्रमाणात उष्णता निर्माण केली. साहाजिकच पृथ्वीवर साठलेले दाट बर्फाचे कवच वितळू लागले. त्या हिमयुगातील बर्फाची चादर थोडीथोडकी नव्हे तर तब्बल पाच किलोमीटर जाडीची होती असा शास्त्र्ाज्ञांचा कयास आहे. त्यावर या आघाताचा परिणाम झाला.
अशनीच्या आघाताने बर्फाचे कवच वितळायला सुरुवात होताच सुमारे 200 अब्ज टन एवढी वाफ पृथ्वीच्या वातावरणात भरून राहिली. त्याचा ‘ग्रीन हाऊस’ किंवा ‘हरित गृहा’सारखा परिणाम होऊन उरलेसुरले बर्फही वितळू लागले असावे.
या वैश्विक घटनेनंतर पृथ्वीवर समुद्र आणि जमीन यांची ‘वाटणी’ झाली. त्यातून पुढे सागरी आणि भूपृष्ठावरील वनस्पती तसंच इतर सजीवांच्या वाढीला पूरक असं वातावरण निर्माण झालं. याच काळात पूर्वी लोहाच्या ऑक्सिडेशनमध्ये संपत चाललेले ऑक्सिजन (प्राणवायू) विपुल प्रमाणात निर्माण होऊ लागला. मिथेनचं प्रमाण ओसरू लागलं. मिथेनवायूत जगणाऱया सूक्ष्म जिवांवर मात्र गदा आली, परंतु नंतर आजपर्यंत जी जीवसृष्टी, जैविक उक्रांती होत होत बहरली त्यातून जैववैविध निर्माण झाले आणि शेवटी माणसासारखा प्रगत सजीव अवतरला. आता अशा प्रकारच्या संशोधनात नेहमीच ‘बहुतेक’ अशा शब्दाने थोडी संदिग्धता असते. म्हणजे पृथ्वीवरील आजचे वातावरण तयार होण्यात कोणकोणत्या घटकांची (फॅक्टर) मदत झाली. याचा विचार करणाऱया संशोधकांना या अशनीपताचं महत्त्व मोठं आहे असं वाटतं. यावर विज्ञानाच्या कक्षेत संवाद होऊ शकतो. एरवी पृथ्वीवर अशनी कोसळणं ही आपत्तीच, पण ऑस्ट्रेलयातील आद्य अशनीपात ‘इष्टापत्ती’ ठरली असावी.





























































