बुलेट ट्रेनसाठी 5000 तर एमयूटीपीला केवळ 550 कोटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकीकडे मुंबई ते अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरीडॉरसाठी 5000 कोटी रुपयांची तरतूद करणाऱ्या केंद्राने मुंबईसाठी मात्र हात आखडता घेतला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर रेल्वेसाठी नेमकी किती तरतूद करण्यात आली आहे त्याचे ‘पिंक बुक’ बुधवारी जाहीर करण्यात आले आहे. त्यात एमयूटीपी-2 आणि एमयूटीपी-3 आणि एमयूटीपी -3(अ) यांना मिळून एकूण अवघा 550 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. गेल्या वर्षी एमयूटीपी प्रकल्पांसाठी 578 कोटींचा निधी मिळाला होता. तर बेलापूर ते उरण मार्गिकेसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात एमयूटीपी -2 साठी 200 कोटी, एमयूटीपी -3 साठी 300 कोटी आणि एमयूटीपी -3(अ) साठी 50 कोटींचा निधी असा एकूण 550 कोटींचा निधी मिळाला आहे. तेवढाच निधी राज्य सरकारकडून या ‘एमयूटीपी’ प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाला मिळणार आहे. यातून एमयूटीपी-2 चे ठाणे ते दिवा आणि सीएसएमटी ते कुर्ला तसेच मुंबई सेंट्रल ते बोरिवली 5 आणि 6 वी मार्गिका हे रखडलेले प्रकल्प मार्गी लागण्यास काहीशी मदत होणार आहे. एमयूटीपी-3मध्ये विरार ते डहाणू चौपदरीकरण, पनवेल ते कर्जत नवा कॉरीडॉर आणि ऐरोली ते कळवा एलिवेटेड कॉरीडॉर या कामांचा समावेश आहे. एमयूटीपी-3 अ साठी तर केवळ 50 कोटींचा निधी मिळाला आहे. पनवेल-वसई-दिवा या नव्या उपनगरीय मार्गिकेचा समावेशही करण्यात न आल्याने प्रवासी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नवीन रेल्वे मार्गांकरिता तरतूद

  • नगर-बीड-परळी वैजनाथ 250कि.मी.- 449.5 कोटी
  • वर्धा-नांदेड (व्हाया यवतमाळ-पसुद) 270कि.मी. -450कोटी
  • इंदूर-मनमाड (व्हाया मालेगाव)368 कि.मी. -4984 कोटी
  • बारामती-लोणंद 54 कोटी – 3 कोटी

दुहेरीकरण, तिसरा आणि चौथा मार्ग

  • कल्याण-कसारा 3 री रेल्वे लाइन-(67.62 कि.मी.) – 55 कोटी
  • भुसावळ-जळगाव 3 री लाइन-(24.13 कि.मी.)-10 कोटी
  • वर्धा (सेवाग्राम) -नागपूर 3 री लाइन-( 76.3 कि.मी.)- 116 कोटी
  • तळेगाव-चिचोंडा 3 री घाट लाइन-(16.53 कि.मी.) – 20 कोटी
  • वर्धा-बल्लारशाह 3 री लाइन-(132 कि.मी.) – 160 कोटी
  • इटारसी-नागपूर (280 कि.मी.) -166 कोटी
  • पुणे-मिरज-लोंढा (467 कि.मी.) – 555 कोटी
  • देण्ड-मनमाड (247.50 कि.मी.) – 42 कोटी
  • मनमाड-जळगाव 3 री लाइन-(160 कि.मी.)- 205 कोटी
  • इगतपुरी-मनमाड 3 री लाइन (124 कि.मी.) – 10 कोटी
  • वर्धा-नागपूर 4 थी लाइन (78.70कि.मी.) – 90 कोटी
  • जळगाव-भुसावळ 4 थी लाइन (24.46 कि.मी.) – 55 कोटी