अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी पालिकेचे प्लॅनिंग सुरू, मुंबईला पूरमुक्ती!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईला पूरमुक्त करण्यासाठी पालिकेने केलेल्या नियोजनबद्ध कामांमुळे दोन वर्षांत पाणी साचणाऱया 273 ठिकाणांमधील 204 ठिकाणे कमी झाली आहेत. अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी पालिकेने प्लॅनिंग सुरू केले असून या वर्षी पावसाळ्याआधी 45 ठिकाणे पूरमुक्त करण्यात येणार आहेत, तर उर्वरित 24 ठिकाणांचे कामही त्यानंतर तातडीने हाती घेण्यात येणार आहे.

मुंबईत अतिवृष्टीच्या वेळी भरती असल्यास काही ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होते. त्यामुळे पालिकेने पाणी साचणारी ठिकाणे कमी करण्यासाठी नियोजनबद्ध काम सुरू केले आहे. मुंबईला पूरमुक्त करण्यासाठी अंधेरीत मोगरा आणि माहुल येथे पंपिंग स्टेशन सुरू करण्यासाठी निविदाही मागवण्यात आल्या आहेत. या दोन पंपिंग स्टेशनांसाठी अर्थसंकल्पात 150 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईतील सर्वात महत्त्वाच्या मिठी नदीच्या सौंदर्यीकरणाच्या कामांतर्गत केल्या जाणाऱया प्रस्तावित उपाययोजनांमुळे मुंबईची पाणी साचण्यातून सुटका होण्यास मोठी मदत होणार आहे.

अशा करणार उपाययोजना

  • भरतीचा प्रभाव कमी करणे आणि सखल भागात साचणारे पाणी कमी करण्यासाठी नदी, नाले, खाडी, समुद्राच्या पातमुखांवर गेटपंप बसवण्यात येणार आहेत. शिवाय नाल्यांमध्येच गेटपंप बसवण्याबाबत प्लॅनिंग सुरू असून यामुळे तिवर तोडण्याची आणि पंपिंग स्टेशनसाठी जागेचीही गरज भासणार नाही.
  • रेल्वेमार्गावरील मोठय़ा मोऱयांमधील गाळ काढण्याचे काम सक्षमतेने करण्यासाठी ‘हायड्रोझूम कॅमेरा’, रेल्वे-रस्ते मार्गावरील मोठय़ा मोऱयांमधील गाळ कार्यक्षमतेने करण्यासाठी ‘रिमोटकंट्रोल्ड स्विंगलोडर’ मशीनची खरेदी करण्यासाठी 2.68 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
  • 2020 च्या पावसाळ्यासाठी मोठे नाले, छोटे नाले आणि मिठी नदीमधून गाळ काढण्यासाठी अनुक्रमे 50 कोटी, 70 कोटी आणि 18 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.