बालाकोटमध्ये ‘जैश’ पुन्हा सक्रिय, हिंदुस्थानवरच्या हल्ल्यासाठी 27 दहशतवाद्यांना प्रशिक्षण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकव्याप्त कश्मीरमधील बालाकोट येथे 2019मध्ये हिंदुस्थानी हवाई दलाने एअर स्ट्राईक केला होता. एअर स्ट्राईकच्या माध्यमातून जैश-ए-मोहम्मद या कुख्यात दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त केले होते. तिथे आता पुन्हा दहशतवादी सक्रिय झाले असून जैशच्या 27 दहशतवाद्यांना हिंदुस्थानवर हल्ला करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे.

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हिंदुस्थानच्या गुप्तचर यंत्रणांनी या हालचालींची माहिती दिली आहे. बालाकोट येथील प्रशिक्षण कुख्यात दहशतवादी मौलाना मसूद अजहर याचा मुलगा युसुफ अजहर नियंत्रित करत आहे. या 27 दहशतवाद्यांपैकी आठ जण हे पाकव्याप्त कश्मिरी आहेत. त्यांना पाकिस्तानातील पंजाब इथले दोन आणि अफगाणिस्तानहून आलेल्या तीन प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण दिलं जात आहे. याच आठवड्यात त्यांचं प्रशिक्षण संपणार असून त्यानंतर हे दहशतवादी हिंदुस्थानात घुसखोरी करतील, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.

गेल्या वर्षी म्हणजे 2019मध्ये 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यातील बसमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. त्यात 40हून अधिक जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर हिंदुस्थानने चोख उत्तर देत 26 फेब्रुवारी रोजी बालाकोट येथे एअर स्ट्राईक करत जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त केले होते. या हल्ल्यावेळी या तळावर जवळपास 300 दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात येत होतं. या हल्ल्यामुळे जैश-ए-मोहम्मदचं कंबरडं मोडून काढण्यात सैन्याला यश आलं होतं.