
जामखेड शहरासाठी जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा मिळवण्यास आमदार रोहित पवार यांना यश आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जामखेड नगर परिषदेच्या पाणी पुरवठा योजनेस नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय मान्यतेचे पत्र आमदार रोहित पवार यांच्याकडे दिले आहे.
आमदार रोहित पवार यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून, तांत्रिकदृष्ट्या योजनेचा सखोल अभ्यास करून पाणी पुरवठा योजनेच्या या कामाला प्रशासकीय मान्यता मिळवली आहे. मान्यता मिळाल्याने आता लवकरात लवकर या कामाला सुरुवात होणार असून जामखेड शहराची तहान भागणार आहे. सध्यस्थितीला जामखेड शहराला 10 दिवसांतून एकदा पाणी पुरवठा होतो. साधारण 40 हजार लोकसंख्या असणाऱ्या या शहराचा पाणी प्रश्न ऐरणीवर होता. उन्हाळ्यात तर एक एक महिना पिण्याचे पाणी ग्रामस्थांना मिळत नव्हते. नागरिकांची तहान भागविण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी पिण्याच्या पाण्याचे टँकर पोहोचवून शहर व वाड्या वस्त्यांची भागवली. जामखेड येथील पाणी पुरवठा योजनेला निधी मिळवून ही योजना कार्यान्वित करू, असा निवडणुकीच्या काळात जामखेडकरांना दिलेला शब्द त्यांनी पाळला आहे. या योजनेमुळे शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असून टंचाईच्या काळात येथे लागणाऱ्या टँकरच्या खर्चाचा सरकारी तिजोरीवर पडणारा बोजाही कमी होणार आहे.
टँकरद्वारे पाणी पुरवठा करत असताना महिलांकडून पाण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी होत होती. पाठपुरावा करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार,नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे संबंधित सर्वच मंत्री अधिकारी यांच्यासोबत बैठका घेऊन वेळोवेळी पाठपुरावा केला आणि योजनेस मंजुरी मिळाली. त्यामुळे ‘मी फक्त बोलतच नाही तर प्रत्यक्षात करून दाखवतो’ असे रोहित पवार यांनी सांगितले.






















































