ठोकसभा! काँग्रेस-भाजपचे खासदार भिडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
parliament

दंडुका, टय़ुबलाइट या टिकेवरून सुरू असलेल्या वादाचे तीव्र पडसाद शुक्रवारी लोकसभेत उमटले. प्रश्नोत्तराच्या तासात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान राहुल गांधींनी केल्यामुळे निषेध नोंदविला आणि गोंधळाला सुरूवात झाली. काँग्रेस खासदार मणिकम टागोर हे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या अंगावर धावून गेले, तर भाजप खासदार बृजभूषण शरण यांनी मणिकम यांची गचांडी पकडली. प्रचंड गदारोळामुळे ठोकसभेत रूपांतर झाले. अखेर लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. दरम्यान, दिल्ली विधानसभेसाठीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना सत्ताधारी भाजपकडून जाणूनबुजून हंगामा करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.

सभागृह अवाक् झाले
लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरळीत सुरू होता. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींचे नाव पुकारले. राहुल गांधी हे वायनाड मतदारसंघातील आरोग्य खात्याशी संबंधित प्रश्न उपस्थित करणार होते. मात्र, प्रश्न उपस्थित करण्यापूर्वीच आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन उभे राहिले आणि स्पीकर सर एक्सक्युज मी म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांचा अपमान केला आहे. त्यांनी सभागृहात माफी मागावी अशी मागणी केली. आरोग्यमंत्र्यांनी जाहीर सभेतील वक्तव्याचा मुद्दा उपस्थित करून प्रश्नोत्तराच्या तासात माफीची मागणी केल्याने सभागृह आवाक झाले. काँग्रेस खासदार संतप्त झाले. तामिळनाडुतील काँग्रेस खासदार मणिकम टागोर हे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या दिशेने धावले आणि कागदपत्रे फाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भाजप खासदार आणि कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष बृजभूषण शरण यांनी मणिकम यांना रोखण्याचा प्रयत्न करीत त्यांची गचांडी पकडली. केंद्रीयमंत्री स्मृती इराणी, भाजप खासदार जगदंबिका पाल, निशिकांत दुबे यांनी मणिकम यांना मागे लोटले. काँग्रेस खासदारांनी वेलमधून उतरून घोषणाबाजी केली. भाजप खासदारांनीही घोषणा दिल्या. अध्यक्षांनी सुरुवातीला दुपारी 1 पर्यंत त्यानंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले.

बाबूल सुप्रियोंचीही जीभ घसरली
पंतप्रधान मोदी यांनी काल भाषणात काँग्रेसचे गटनेते अधिरंजन चौधरी यांच्यावर टीका केली होती. पण आज प्रश्नोत्तराच्या तासांत केंद्रीय राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांची जीभ घसरली. अधिरंजन चौधरी यांच्यावर टीका करताना सुप्रियो म्हणाले, ‘दादा, आप जीम खेलने के बजाय सवाल का उत्तर ठिक से पढिये. जादा अधीर मत होईये नहीं तो में आपको डांट दुंगा.’ यावर अध्यक्ष ओम बिर्ला संतापले. ‘आप किसी भी सदस्य को डांट नहीं सकते. ये आपका अधिकार नहीं है.’ अशा शब्दात अध्यक्षांनी सुप्रियो यांचे कान उपटले.

हल्ल्यांची भीती मी बाळगत नाही – पंतप्रधान मोदी
काही नेते मला लाठय़ा-काठय़ांनी मारण्याची भाषा करत आहेत. मात्र, देशातील माता-भगिनींचे आशीर्वाद माझ्या मागे आहे. त्यामुळे मी अशा हल्ल्यांची भीती बाळगत नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राहुल गांधींवर टीका केली. बोडो शांतता करारानंतर पहिल्यांदा पंतप्रधान मोदी यांनी आसाम दौरा केला. यावेळी नाव न घेता राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले. माझ्यामागे माता-भगिनींचे सुरक्षाकवच आहे. त्यामुळेच हे सुरक्षाकवच भेदून माझ्यावर लाठय़ा-काठय़ा चालविण्याची हिंमत कुणाचीही नाही असे पंतप्रधान म्हणाले.

नरेंद्र मोदी पंतप्रधानांसारखे वागत नाहीत – राहुल गांधी
पंतप्रधानपदाची एक प्रतिष्ठा असते. पंतप्रधानांचे वागणे, बोलणे हे विशिष्ठ पद्धतीने आणि प्रतिष्ठा राखून असते. पण नरेंद्र मोदी हे पंतप्रधानांसारखे वागत नाहीत, असे टीकास्त्र्ा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना सोडले. आम्हाला संसदेत बोलू देत नाही. प्रश्न विचारले तर पंतप्रधान मोदी उत्तर देत नाहीत. पंतप्रधानांना संरक्षण मिळावे यासाठीच भाजपकडून संसदेत गोंधळ घातला जात आहे. मी आज वायनाडचा मेडिकल कॉलेजचा प्रश्न उपस्थितीत करणार होतो. पण मला बोलूच दिले नाही. खासदार मणिकम यांनी कोणावर हल्ल्याचा प्रयत्न केलेला नाही. त्यांना जाणूनबुजून भडकविण्याचा प्रयत्न झाला असा आरोप राहुल गांधींनी केला. पंतप्रधान मोदी काल पंडित नेहरू, काँग्रेस, पाकिस्तानवर बोलले. पण देशातील वाढती बेरोजगारीच्या मुद्दय़ावर ते बोलले नाहीत याकडे राहुल गांधींनी लक्ष वेधले.

का घडले?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचार सभेत वाढलेल्या बेरोजगारीचा संदर्भ देऊन संतप्त बेरोजगार तरुण सहा महिन्यांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दंडुक्याने मारहाण करतील असे विधान केले होते. काल गुरुवारी पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत आपल्या भाषणात याचा संदर्भ देऊन सहा महिने मी आणखी सूर्यनमस्कार करून माझी पाठ मजबूत करेन असे नाव न घेता राहुल गांधींवर ‘टय़ुबलाइट’ अशी टीका केली होती. आज आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी हा मुद्दा पुन्हा उपस्थित केल्याने गोंधळ उडाला.

दिल्ली निवडणुकीसाठी भाजपची खेळी
दिल्ली विधानसभेसाठी उद्या (दि. 8) मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपने आज लोकसभेत हायप्रोफाइल ड्रामा घडवून आणला आहे अशी चर्चा संसद भवन परिसरात रंगली होती.