
>> प्रशांत गौतम
पुण्यात दि. 8, 9 फेब्रु. 2020 या कालावधीत सुरू असलेल्या 29 व्या अ.भा. मराठी बालकुमार साहित्य संमेलन अध्यक्षपदाचा सन्मान प्रख्यात गीतकार, कवी, पटकथाकार, ललित लेखक, कथालेखक प्रवीण दवणे यांना मिळाला. वाचक आणि रसिकांच्या मनात त्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे. बालसाहित्यात पूर्वसुरींचे योगदान, बालसाहित्यातील आजची सद्यस्थिती, वाचन संस्कृती चळवळ याविषयी दिलखुलास गप्पा मारल्या. आजच्या बालसाहित्यात ग्रामीण उपेक्षित मुलांचा संघर्ष आला पाहिजे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
अ.भा. मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली याबद्दल काय वाटते?
– अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड होणे हा मला शुभसंकेत वाटतो. खरे तर या संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणतीही निवडणूक नसते की कोणतेही राजकारण नसते. शिवाय मतं मिळविण्याचाही प्रश्न नसतो. मुलांचे मन जसे निर्मळ असते ना, तशी ही निवड असते. संमेलनाच्या माध्यमातून मला कवी, शिक्षक, पालक यांच्याशी मनोगत व्यक्त करता येणार आहे.
विविध वाङ्मय प्रकार हाताळत असताना बालसाहित्याकडे वळावे असे आपल्याला का वाटते?
– लहान मुलांच्या जगात मनाने फिरण्यासाठी तीव्र कल्पनाशक्तीची जोड असावी लागते. सुदैवाने मला ती लाभली. शिवाय कवीचं मन असल्यामुळे बाल जगतात, त्यांच्या आयुष्यात, स्वप्नात विहार करणे ही मला सृजनशील संधी आहे असे वाटते आणि म्हणूनच मोठय़ांचं लेखन करताना जेवढा वेळ मी मोठय़ांसाठी देत असतो, तेवढाच वेळ लहान मुलांसाठी लेखन करतानाही देत असतो आणि त्याला बालवाचकांचाही उदंड प्रतिसाद मिळतो.
अनेक प्रतिभावंत सारस्वतांनी आवर्जून मुलांसाठी लिहिले. त्यांच्या लेखन सहभागाने मराठी बालसाहित्य सशक्त, संपन्न झाले. आज असे चित्र फार दिसत नाही.
– तुमचा मुद्दा मला मान्य आहे. बालसाहित्य लिहिणे म्हणजे फुकट वेळ घालवणे, शिवाय त्यास विशेष मान्यताही मिळत नसते असे समजणे ही तथाकथित प्रथितयश लेखकांची मानसिक उणीव आहे. खरे तर अनेक प्रतिभावंत सारस्वतांनी आपल्या लेखणीने बालसाहित्य समृद्ध केले आहे. मोठय़ा लेखकांना हे माहीत होते की, उद्याचा परिपक्व वाचक हा आजच्या बालसाहित्यातून निर्माण होणारा असतो. त्यामुळे ते बालवाङ्मय निर्मितीकडे लक्ष देऊन लिहीत असत. येथे एक आठवण नमूद करतो. ज्यांनी माझे मोठय़ांचे साहित्य वाचलेले असते, ते मला प्रत्यक्ष भेटतात. पत्रातूनही संवाद साधतात. आपल्या लेखनातून एक संवेदनशील पिढी निर्माण होत असल्याचा मला आनंद असतो.
साने गुरुजी, भा.रा. भागवत, लीलावती भागवत, राजा मंगळवेढेकर, यदुनाथ थत्ते, ना. धों. ताम्हणकर ते शंकर सारडांपर्यंत नावे सांगता येतील. आज तसे चित्र का दिसत नाही?
– आता कार्यकर्ता ही भावना लोप पावत चालली आहे. साहित्यिकांनासुद्धा चटपटीत यश हवे असते. कार्यकर्ता म्हणजे भविष्यकालीन अभिरुचीसंपन्न करणारा गवई असतो, तर चळवळ हा त्याचा रियाझ असतो.मी विनम्रपणे सांगू इच्छितो की, अनेक छोटय़ा छोटय़ा शाळांतून माझे जे अनेक कार्यक्रम झाले, त्यातून मला बालवाचकांशी जवळीक साधता आली. वाचन, लेखनविषयक कार्यशाळा घेता आल्या. त्यातून शाळेपासून वंचित असणाऱया भटकी, श्रमजीवी मुले भेटली. त्यांच्यासाठी कविता कशा ऐकाव्यात, वाचन कसे व कोणते करावे हे कार्यशाळेच्या माध्यमातून सांगितले. शब्दांचा आनंद मला जो डोंगरदऱयांमधील मुलांत दिसला तो पंचतारांकित शहरामध्ये आढळला नाही.
आज नेट, इंटरनेट, मोबाईलच्या काळात वाचन संस्कृती धोक्यात आली आहे. याबाबतीत आपल्याला काय वाटते?
– आज वाचन संस्कृतीचा प्रश्न महत्त्वाचा आहेच. आजच्या घरात बाहय़ सुखावणाऱया सर्व वस्तू चटकन सापडतील, परंतु आंतरिक आवडीचा महोत्सव ठरणारी पुस्तकांची कपाटं सापडत नाहीत. अर्थात हा दोष लहान मुलांचा नाही. म्हणून मी आवर्जून सांगेन की, महाराष्ट्रात पुस्तकांचे एक गाव होण्यापेक्षा प्रत्येक घरच गाव व्हावे. याबाबतीत माझा अनुभव असा आहे की, शिक्षक-पालक वाचन करताना दिसतात. मुलेही आपली पुस्तके वाचताना दिसतात. पालकांनी आपल्या घरात ग्रंथाचे पर्यावरण निर्माण करावे आणि तेच माझे आवाहन आहे.
आजचे बालसाहित्य आणि बालसाहित्यकार कोणत्या वळणावर आहेत?
– खरे तर बदलत्या बालवाचकांच्या संवेदना आजच्या बालसाहित्य लिहिणाऱया लेखकांना टिपता आल्या नाहीत. कारण आता काऊ-चिऊचे जग बदलले आहे, ते सत्यातल्या परिकथेसारखे अवतरले आहे. म्हणूनच जयंत नारळीकर, बाळ फोंडके यांच्या विज्ञानकथा आजही महत्त्वाच्या ठरतात. त्याचप्रमाणे आज मुला-मुलींसाठी उत्तम प्रवासवर्णने नाहीत. किती मोठी पोकळी आहे ही? अजूनही तीस वर्षांपूर्वीचीच बालनाटय़े चालतात ही शोकांतिका आहे. का नाही मुलांसाठी बालनाटय़ चळवळ सुरू होत? मुलं मोठी होत आहेत, परंतु बालनाटय़-बालसाहित्य मोठं व्हायला हवं. म्हणून केवळ आदर्शवादात न गुंतता ग्रामीण उपेक्षित भागातील मुलांचा संघर्ष आजच्या बालसाहित्यात, बालनाटय़ात यायला हवा.
या प्रवासातील एखादी खास आठवण…
– 1985च्या सुमारास दैनिक ‘सामना’ उत्सव पुरवणीत माझं ‘प्रकाशाचं अक्षर’ हे सदर सुरू झालं. त्यातील लेखनाने शिवसेनाप्रमुख मा. श्री. बाळासाहेब ठाकरे प्रभावित झाले. त्यांच्या अनेक भेटी झाल्या. माझं लेखन वाचून ते म्हणत ‘‘पोरगं छान लिहितंय!’ त्यांनी माझ्या लेखनाची दखल घेऊन शाबासकी दिली. त्यांनी दिलेले प्रोत्साहन माझ्या पुढील लेखनप्रवासासाठी महत्त्वाचे ठरले.




























































