निवडणूक आयोग मतदानाची आकडेवारी का जाहीर करत नाही? आपचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होऊन 24 तास उलटले तरी निवडणूक आयोग मतदानाची आकडेवारी का जाहीर करत नाही असा सवाल आपने उपस्थित केला आहे. तसेच यात काही काळं बेरं असल्याचा संशयही आपने व्यक्त केला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी मतदान पार पडले. कुठलीही निवडणूक पार पडली की निवडणूक आयोग एकूण मतदानाची आकडेवारी जाहीर करते. परंतु दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानाची आकडेवारी अद्याप जारी करण्यात आलेली नाही. आप नेते संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाला फैलावर घेतले आहे. सिंह म्हणाले की, दिल्ली निवडणुकीत किती मतदान झाले हे दिल्ली आणि देशाच्या जनतेला जाणून घ्यायचे आहे. निवडणुकीची आकडेवारी जाहीर करण्यास आयोग एवढा का वेळ लावत आहे. लोकसभा निवडणुकीत एक तासांत मतदानाची आकडे जाहीर करत असतं. दिल्ली सारख्या छोट्या राज्याची आकडेवारी जाहीर करायला का वेळ लागतोय?

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी भाजप नेत्याचे ट्विट रीट्विट करून निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले आहे. भाजप नेते मतदानाचे आकडे देत आहेत. तर दुसरीकडे निवडणूक आयोग आकडेवारी जाहीर करत नाही. हे काय चाल्लंय? आयोगाला भाजप कार्यालयाकडून आकडेवारी मिळणार का असा टोलाही त्यांनी लगावला आहे.