जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची भिंत कोसळली, सुट्टी असल्याने मोठा अनर्थ टळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पारनेर तालुक्यातील आदर्श गावाकडे वाटचाल करत असलेल्या भाळवणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पश्‍चिम दिशेकडील इमारतीची भिंत रविवार दि.9 रोजी दुपारी तीनच्या सुमारास कोसळली. सुदैवाने रविवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे विद्यार्थी शाळेत नव्हते त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. गेल्या 5 ते 6 वर्षांपासून या शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीबाबत तसेच नवीन खोल्यांच्या मागणीचे प्रस्ताव वेळोवेळी प्रशासनाकडे दाखल करुनही प्रशासकीय अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे तसेच पदाधिकार्‍यांकडेही अनेक वेळा यासंदर्भात मागणी करुनही या शाळेच्या खोल्यांसंदर्भात कोणतीही कार्यवाही अद्यापपर्यंत झालेली नाही.

या इमारतीच्या इतर भागातही मोठमोठे तडे गेले असून दहशतीच्या सावटाखाली शिक्षक व विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शाळेत बसावे लागत आहे. आजच्या या घटनेमुळे पालकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात शाळेचे मुख्याध्यापक श्रीपती आबुज यांच्याशी संपर्क साधला असता पहीली ते चौथी या वर्गात एकूण 224 विद्यार्थी शिक्षण घेत असून 9 शिक्षक येथे कार्यरत असून ही संपुर्ण इमारत पाडण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवला आहे. जिल्हा परिषदेने ही इमारत पाडण्याचे परवानगी पत्र दिलेले परंतु बांधकाम निधीबाबत कोणतेही निर्देश नसल्याने इमारत कशी बांधावी हा प्रश्‍न अनुत्तरीतच असल्याचे मुख्याध्यापक आबुज यांनी सांगितले.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र गोविंद चेमटे यांनी सांगितले की, शाळेच्या धोकादायक इमारतीबाबत जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांनी धोकादायक इमारतीत वर्ग न भरवता दुसरीकडे भरवा असे सांगितले आहे. इमारत बांधकामासाठी जिल्हा परिषदेकडे निधी नसून, जेव्हा निधी उपलब्ध होईल तेव्हा तो दिला जाईल असे सांगण्यात आले.