मोबाईलवरून लोकलचे तिकीट काढण्याचे प्रमाण वाढले,  एकाच दिवशी साडेपाच लाख तिकिटे बुक  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वे तिकिटांसाठी बुकिंग खिडक्यांवर लागणार्‍या लांबच लांब रांगा कमी करण्यासाठी तसेच डिजिटल पेमेंटचा वापर वाढण्यासाठी यूटीएस ऍपचा प्रसार वाढवण्यात येत आहे. त्यामुळे या ऍपद्वारे पेपरलेस तिकिटे काढण्याचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई डिव्हिजनमध्ये 3 फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी साडेपाच लाख मोबाईलची ई-तिकिटे विकली जाण्याचा रेकॉर्ड झाला आहे.

पश्चिम रेल्वेवर 3 फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी तब्बल 5.5 लाख प्रवाशांनी यूटीएस ऍपद्वारे मोबाईलवर लोकलची तिकिटे बुक करून नवा रेकॉर्ड केला आहे. त्या दिवशी प्रवास केलेल्या (50,28,043) प्रवाशांच्या तुलनेत हे प्रमाण 11.3 टक्के इतके आहे. नोव्हेंबर 2018 मध्ये दर दिवसाला मोबाईलवरून तिकीट काढण्याचे सरासरी प्रमाण 1.24 लाख होते. ते जानेवारी 2020 या महिन्यात वाढून प्रतिदिन 3.39 लाख इतके वाढले असल्याचे पश्चिम रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

यूटीएस ऍपला लोकप्रिय करण्यासाठी

यूटीएस मोबाईल ऍपला लोकप्रिय करण्यासाठी पश्चिम रेल्वेने अनेक मोहिमा सुरू केल्या होत्या. प्रवाशांना यूटीएस ऍपची वैशिष्ट्ये, ते डाऊनलोड करण्याची प्रक्रिया आणि ते कसे वापरावे याबद्दल शिक्षित करण्यासाठी विविध स्थानकांवर अनेक मोहिमा राबवल्या जात आहेत. तसेच ऍनिमेटेड व्हीडीओ आणि रेडिओ जिंगल्सवर तसेच छापील तिकिटांवरदेखील यूटीएस ऍपची जाहिरात केली जात आहे. याशिवाय मोबाईल ऍपवर सिझन पासदेखील काढण्याची सोय असून त्यावर 5 टक्के बोनस दिला जात आहे.