रशियात हवाई दलाच्या चार वैमानिकांचे प्रशिक्षण सुरू, वर्षभराच्या प्रशिक्षणानंतर तिघे अंतराळात जाणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानची महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहीम ‘गगनयान’साठी हवाई दलाच्या चार वैमानिकांचे रशियात सोमवारपासून प्रशिक्षण सुरू झाले. हे प्रशिक्षण एक वर्ष सुरू राहणार आहे.

‘इस्रो’च्या अधिकाऱयांनी आज दिलेल्या माहितीनुसार चारही वैमानिक रशियातील प्रशिक्षणात बायोमेडिकल, फिजिकल प्रॅक्टिस, सोयुज ऍण्ड स्पेसशिप याची माहिती घेतील. रशियाला पाठवण्याआधी आठवडाभर चौघांवर काही चाचण्या घेण्यात आल्या आहेत. लॅब इन्व्हिस्टिगेशनसह फिजिकल स्टॅमिना, रेडिओलॉजिकल, क्लिनिकल, सायकोलॉजिकल स्वरूपाच्या या चाचण्या होत्या.

रशियाच्या युरी एस. गागरीन स्टेट सायंटिफिक रिसर्च ऍण्ड टेस्टिंग कॉस्मोनॅट ट्रेनिंग सेंटरमध्ये चारही वैमानिकांचे प्रशिक्षण सुरू आहे. 12 एप्रिल 1961 साली अंतराळात पोचणारे पहिले अंतराळवीर युरी गागरीन यांच्या नावावरून या स्पेस सेंटरला नाव देण्यात आले आहे. इस्रो 2022 साली ‘गगनयान’ मानवी मोहिमेला सुरुवात करेल. या मोहिमेत कोणतीही महिला अंतराळवीर नसली तरी महिला रोबोट व्योममित्राला अंतराळात पाठवले जाणार आहे. ‘इस्रो’चे प्रमुख सिवन यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘गगनयान’च्या अंतिम मोहिमेआधी डिसेंबर 2020 आणि जुलै 2021 अंतराळात रोबोट पाठवण्यात येणार आहेत.