
आसामात लागू करण्यात आलेल्या एनआरसीशी संबंधित सर्व डेटा अधिकृत वेबसाईटवरून गायब झाला आहे. मात्र गृह मंत्रालयाने ही माहिती पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगत सावरासावर करण्याचा प्रयत्न केला आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे ही माहिती दिसत नसली तरी लवकरच ती दिसेल असे स्पष्टकरण केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहे.
एनआरसीमध्ये सामील झालेल्या आणि बाहेर असलेल्या सर्व नागरिकांची पूर्ण माहिती ‘एनआरसीआसाम डॉट एनआयसी डॉट इन’ या वेबसाईटवर अपलोड करावी असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबरमध्ये दिला होता. या वेबसाईटवर 3.11 कोटी लोकांची माहिती नोंदण्यात आली होती. या वेबसाईटवर एनआरसीमध्ये समाविष्ट नसलेल्या 19.06 लाख नागरिकांचीही माहिती उपलब्ध होती. आता या वेबसाईटवर या लोकांची माहिती दिसत नाही. एनआरसी समन्वयक प्रतीक हजेला यांची बदली झाल्यानंतर त्या जागी आसाम सरकारने हितेश देक सरमा यांची नियुक्ती केली आहे. नव्या समन्वयक अधिकाऱयाने कार्यभार स्वीकारल्यापासून यादी अपडेट करण्याचे काम सुरू होते. पण विप्रो कंपनीशी आसाम सरकारचा करार 19 ऑक्टोबर 2019 पर्यंतच होता. तो आता संपला आहे. त्यामुळे 15 डिसेंबरनंतर या वेबसाईटवरील सर्व डेटा ऑफलाइन झाला आहे.
नूतनीकरण नसल्याने वेबसाईट ऑफलाइन
आसाम सरकारने एनआरसीचा डेटा नोंदण्यासाठी विप्रो कंपनीशी क्लाउड स्पेसशी संबंधित करार केला होता. आता तो संपला आहे. 31 ऑगस्ट 2019 रोजी प्रकाशित झालेल्या अंतिम एनआरसी यादीमध्ये 19 लाख नागरीकांना समाविष्टच करण्यात आले नव्हते. वेबसाईटसाठी आवश्यक असलेल्या क्लाऊड स्पेससाठी सरकारने विप्रो कंपनीशी केलेला करार संपला आहे. त्याचे नूतनीकरणच करण्यात आलेले नाही.



























































