
हरिओम आदेश.. जय अलखनिरंजन.. असे म्हणत अखेर प्रतीक्षेत असलेल्या मलंगगडच्या फ्युनिक्युलर रेल्वेला मे महिन्याचा मुहूर्त मिळणार आहे. या अत्याधुनिक रेल्वेचे काम अंतिम टप्प्यात असून तीन तासांचे अंतर अवघ्या सात मिनिटांत कापता येणार आहे. एकाच वेळी 120 प्रवासी मलंगगडावर जाणार असल्यामुळे पर्यटनालादेखील चालना मिळणार आहे. या फ्युनिक्युलर रेल्वेमुळे मलंग यात्रेच्या दिवशी गडावर जाणे भक्तांना सोयीचे ठरणार आहे. शिवसेनेने केलेल्या पाठपुराव्यामुळे फ्युनिक्युलर रेल्वेचे स्वप्न अखेर साकार होत आहे.
मलंगगडावर जाण्यासाठी फ्युनिक्युलर रेल्वेचे काम 2012 मध्ये सुरू झाले. पण काही अडचणींमुळे हे काम सुमारे दीड वर्षे रखडले होते. सर्व अडथळे पार करत सुप्रीम कंपनीमार्फत रेल्वेचे काम येत्या तीन महिन्यांत पूर्ण होणार आहे. या रेल्वेला एकूण तीन सुसज्ज बोगी आहेत. प्रत्येक बोगीत 60 असे एकूण 120 प्रवासी एकाच वेळी मलंगगडावर जाऊ शकतील. तिसरी बोगी मालवाहतुकीसाठी असून त्याची साडेतीन मेट्रिक टन वजन वाहून नेण्याची क्षमता आहे. मलंगगडावर जाण्यासाठी फ्युनिक्युलर रेल्वे सुरू करावी यासाठी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेली अनेक वर्षे पाठपुरावा केला. राज्य व केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार केल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.
केंद्राच्या आडमुठेपणामुळे किंमत वाढली
मलंगगडाच्या फ्युनिक्युलर रेल्वेसाठी 2012 मध्ये 45 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र केंद्र सरकारच्या अनेक परवानग्या मिळण्यास उशीर झाला. त्यामुळे दीड वर्षे काम रखडले. शिवसेनेच्या पाठपुराव्यानंतर हे काम पुन्हा जोमाने सुरू झाले. आता ते काम मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मात्र केंद्र सरकारच्या आडमुठेपणामुळे प्रकल्पाची किंमत सुमारे 100 कोटींवर जाऊन पोहोचली.
- ही रेल्वे सिंगल ट्रॅकची असून मलंगगड बस स्टॉपपासून त्याचा सटार्टिंग पॉइंट आहे. मलंगगडच्या पायथ्याजवळ त्यासाठी आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहेत.
- फ्युनिक्युलर रेल्वेचे डिझाईन जपानचे असून त्याच्या बोगी वाई येथील कारखान्यात बनवण्यात आल्या आहेत. या बोगी मलंगगडच्या पायथ्याशी दाखल झाल्या असून काम पूर्ण झाल्यानंतर त्याची चाचणी घेण्यात येईल.
- मे महिन्यात ही रेल्वे सुरू होण्याची शक्यता असून सुट्टीच्या काळात बच्चे कंपनीलादेखील मलंगगडावर काही मिनिटांतच जाता येईल. त्याशिवाय ज्येष्ठ नागरिक, वृद्ध महिला, दिव्यांगबांधव यांच्यासाठीदेखील ही रेल्वे वरदान ठरणार आहे.
- या रेल्वेपर्यंत पोहोचण्यासाठी 1.2 किलोमीटरचा सिमेंटकाँक्रीटचा ऍप्रोच रोड बांधण्यात येणार असून त्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी शिवसेना नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केला. हा रोड चार लेनचा असल्यामुळे वाहतूककोंडी होणार नाही.




























































