शपथविधी सोहळ्यासाठी अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधानांना निमंत्रण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल रविवारी 16 फेब्रवुवारीला तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दिल्लीतील रामलीला मैदानात हा शपथविधी सोहळा होणार आहे. या कार्यक्रमासाठी इतर राज्यातील कोणत्याही नेत्यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे अरविंद केजरीवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या सोहळ्याचे निमंत्रण देणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. केजरीवाल यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या सोहळ्याचे निमंत्रण देत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

दिल्लीकर जनतेला या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. दिल्लीतील निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पंतप्रधानांनी केजरीवाल यांना शुभेच्छा दिल्या होत्या. दिल्लीतील जनतेच्या अपेक्षा केजरीवाल पूर्ण करतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती. केजरीवाल यांनी या शुभेच्छांचा स्वीकार करत पंतप्रधानांना धन्यवाद दिले होते. तसेच दिल्लीच्या विकासासाठी केंद्र सरकारसोबत काम करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. आता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही या सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे. केजरीवाल यांनी ऑडिओ मेसेजने सर्व दिल्लीकरांना या सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे. तसेच आपच्या विजयानंतर चर्चेत आलेल्या बेबी मफलरमॅनलाही या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. या सोहळ्यात तो विशेष अतिथी असणार आहे.