
>> विक्रम गायकवाड, [email protected]
प्राणी आणि माणूस दोघंही निसर्गाची लेकरं. पण बऱयाचदा दोघांमधला संघर्ष ऐरणीवर येतो. प्राण्यांसारखा थोडा सभ्यपणा माणसाने अंगी बाणवला तर बरेच प्रश्न सुटतील नाही का… मग निर्माण होईल निखळ मैत्र.
‘जनावर’ या शब्दाची फोड करायची म्हटली तर मला असं वाटतं ‘जे न आवरे’ ते जनावर. मग प्रश्न असा येतो की, आपण प्राण्यांना जनावर का म्हणतो, कारण या पृथ्वीवरील प्रत्येक प्राणी (माणूस सोडून) अत्यंत सभ्य आणि ecology system ला पूरकच आहे. कदाचित आपल्याला त्यांना आवरणं कठीण म्हणून हे नाव पडलं असावं. असो. माझा मुद्दा हा आहे की, आपण गुन्हेगार, खुनी, बलात्कारी, भ्रष्टाचारी, समाजकंटक यांना सरसकट जनावर म्हणतो, ते मात्र मला कुठेतरी खटकतं. आठवून बघा, गुगल करा. पण गेल्या करोडो वर्षांत जगभरात एका तरी मनुष्येतर प्राण्यात वरच्या पैकी एखादी ही विकृती असल्याचं उदाहरण आहे का? तर ‘नाही’. मग घृणास्पद कृत्य करणाऱया नराधमांना ‘नीच’ संबोधित करण्यासाठी वापरला जाणारा ‘जनावर’ हा शब्द मला खरंच चुकीचा वाटतो.
चित्त्याला, वाघ-सिंहांना शिकार करताना बघा. ते त्यांची भूक भागेल अशी एखादी शिकार निवडतात आणि मग आपली नजर त्या प्राण्यावरून हटू देत नाहीत. एकदा पाठलाग सुरू झाला की, मग आजूबाजूला कितीही प्राणी पळोत त्यांचं सावज ठरलेलं असतं. एकदा शिकार झाली की, जंगलाच्या त्या भागातली धावपळ एकदम थांबते. पुन्हा शांतता. सगळे शाकाहारी प्राणी डोळे झाकून आपापल्या कामाला लागतात. कारण त्यांना माहिती असतं की, पोट भरलेला मांसाहारी ‘हिंस्र’ प्राणी हा आता पूर्णपणे निरुपद्रवी आहे. ‘आजूबाजूला खूप आहे. सगळंच ओरबाडून घे’, असा संदेश त्याचा मेंदू त्याला कधीच देत नाही. मग कदाचित एखाद्या घनदाट जंगलात जिथे अजून आपला कॅमेरा पोहोचलेला नाही तिथे असंही घडत असेल की, एखादं हरणाचं पिलू उडय़ा मारत मारत वाघाच्या जवळ जाऊन म्हणत असेल, ‘काका जरा उठा ना. तुम्ही बसलेला आहात त्या खाली खूप कोवळं गवत आहे आणि ते खायला मला खूप आवडतं आणि मग तो वाघही बिचारा हळूच त्याच्या राजेशाही थाटात एक लूक देऊन त्या पिलाला ते गवत खाऊ देत असेल.’
सगळीच माणसं स्वतःचं पोट भरल्यावर अशी नैतिकता दाखवतात का? आपल्यापाशी आलेल्या आपल्यापेक्षा दुबळ्या आणि लाचार घटकांकडेच ‘संधी’ म्हणून पाहतात. मग अशा या’ संधीसाधू’ माणसांना ‘जनावर’ म्हणून संबोधणं हा त्या शब्दाचा अपमान नाही का? जनावरांना त्यांच्या पोटाचं आणि भुकेचं माप माहिती असतं, पण ज्यांचं पोट कधी भरतच नाही, ज्यांची भूक कधी मिटतच नाही अशा भस्म्या झालेल्या माणसांना जनावर तरी कसं म्हणायचं? हे सांगताना, ‘माणूस हा वाईटच आहे आणि त्याची भूतलावर राहायची पात्रताच नाही’, असं माझं अजिबातच म्हणणं नाही, पण आपण आपल्या ecology system चा विचार केला आणि हा निसर्गाचा प्रचंड मोठा असा गाडा ओढताना आपण कुठल्या स्थानावर आहोत याचा विचार केला, तर आपला क्रमांक शेवटचा लागतो. म्हणजे पृथ्वीवरची मनुष्यजाती पूर्णपणे नष्ट झाली, तरीही ही पृथ्वी लोप पावणार नाही. उलट बहरेल. जर साधी मधमाशी या पृथ्वीवरून संपूर्णपणे नष्ट झाली तर पुढच्या दीड-दोन वर्षांत निसर्गाचा समतोल ढासळेल आणि इथलं जीवन पूर्णपणे संपेल. आपण जर एवढय़ा मोठय़ा चाकाचा एवढासाच भाग आहोत, तर या नैसर्गिक संपत्तीवरही आपला तेवढासाच हक्क आहे आणि तेवढय़ाचाच वापर आपण करायला हवा. बँकेमध्ये भरपूर पैसे असतात, पण आपला हक्क फक्त आपल्या अकाऊंटवर असलेल्या रकमेवरच असतो. त्याचप्रमाणे या निसर्गाच्या बँकेत आपलं अकाऊंट केवढं आहे, ते ओळखून आपण तेवढंच withdraw करायला हवं. ‘जास्त घेणं’ हा दरोडा असतो. जो आपण वर्षानुवर्षे घालतो आहोत. आता जनावरांसारखं आपलं पोट, आपली भूक ओळखूयात. आपल्यातल्या खऱया जनावराला जागं करूयात. म्हणजे सगळेच सुखी होऊ…
























































