अमेरिकेच्या सुरक्षेला भुयारी सुरुंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रतीक राजूरकर

अमेरिका आणि मेक्सिकोची सीमा तस्करीच्या कारणामुळे अनेकदा चर्चेत येत असते. याच सीमेवर आतापर्यंत सापडलेल्या असंख्य तस्करी भुयारांतील सर्वाधिक लांबीचे भुयार समोर आले आहे. या भुयाराची लांबी 4309 फुट आहे. या भुयारात लिफ्ट, रेल्वे ट्रक, ड्रेनेज सिस्टीम, एअर व्हेंटिलेटर, हाय व्होल्टेज इलेक्ट्रिक केबल्स आहेत. मेक्सिकोतील तीजुआना औद्योगिक केंद्र ते कॅलिफोर्नियातील सॅन डीऍगो या शहरांना जोडणारे हे भुयार आहे.

जगातील बलाढ्य राष्ट्र म्हणून आज अमेरिकेकडे बघितले जाते. इतर राष्ट्रांना लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः… अशी अमेरिकेची गत आहे. अमेरिकेच्याच दिव्याखालील अंधःकार पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. गेल्याच आठवड्यात मेक्सिकोच्या तीजुआना (Tijuana) सीमेवरून खोदलेले एक भुयार आढळून आले आहे. त्याचे दुसरे टोक हे अमेरिकेच्या सॅन दिएगो शहरातील एका गोदामात सापडले. यावरून मेक्सिको अमेरिकेच्या अंडरवर्ल्डचे अंडरग्राऊंड संबंध पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आले आहेत. यंदा मात्र हे संबंध जरा अधिकच लांब आणि खोलवर असल्याचे दिसून येतात. गेल्या आठवडय़ात 29 जानेवारी रोजी अमेरिकेच्या प्रशासनाने आढळलेले भुयार हे आजवरचे सर्वाधिक लांब भुयार असल्याचे सांगितले. त्याची लांबी 1.3 कि.मी असल्याचे अमेरिकेच्या प्रशासनानेच जाहीर केले. भुयाराच्या तुलनेने सर्व सोयी सुविधायुक्त असे हे पंचतारांकित भुयार म्हणावे लागेल. कारण भुयाराच्या दोन्ही टोकांना लिफ्ट आहे. जमिनीच्या 71 फूट खोल हे भुयार पाच फूट उंच व दोन फूट रुंद असल्याचे समजते. भुयारात उच्च दाबाच्या विद्युत तारा, 24 तास वीज, सामानाची नेण्यासाठी रेल्वे रूळ, हवा खेळती राहील अशी व्यवस्था व पाण्याचे निस्सारण होण्यासाठी पाइपलाइन आहे. अधिकाऱयांच्या म्हणण्यानुसार 12 फुटबॉल मैदानाच्या आकाराचे हे भुयार आहे. म्हणूनच आजवर सापडलेल्या भुयारांच्या तुलनेत हे सर्वात मोठे भुयार आहे.

2016 सालापासून एक डझनच्या वर मेक्सिको-अमेरिकेदरम्यान अशी भुयारे आढळून आली आहेत. अमली पदार्थांची तस्करी करणाऱयांनी अशी विशेष भुयारे निर्माण केल्याचे प्रशासनाचे मत आहे. मेक्सिकोतून अमली पदार्थांची तस्करी मोठय़ा प्रमाणात होत असते. अमली पदार्थांची तस्करी करणारे आर्थिक दृष्टीने किती सक्षम आहेत याची प्रशस्त भुयारांच्या संख्येवरून प्रचीती येते. अमली पदार्थांचे सर्वाधिक सेवन करणारा देश म्हणून जगात अमेरिकेची गणना होते. अब्जावधी डॉलर खर्च करून तस्करांनी खोदलेली भुयारे अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणा किती हतबल आहेत हेच दर्शवितात. जगात अनेक राष्ट्रांत प्राचीन, इतिहासकालीन भुयारांचा शोध लागत असतो. त्यामुळे त्या राष्ट्रांच्या वैभवात भर पडते. मात्र वर्तमानकाळात अमली पदार्थांच्या तस्करीसाठी भुयारांचा शोध लागणे अमेरिकेच्या कृत्रिम वैभवाची शोभा करणाऱया आहेत असेच म्हणावे लागेल.

अद्याप अमेरिका अथवा मेक्सिकोने कुणाला अटक केली नसल्याचे समजते. अमेरिकेने कुणावर संशय व्यक्त केलेला नाही, परंतु मेक्सिकोचा कुख्यात तस्कर ऐल चापो हा अमेरिकेच्या तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगतो आहे. त्याच्या मेक्सिकोतील सिनालोआ कार्टलवर मेक्सिकोच्या तपास अधिकाऱयांना संशय आहे. सध्या जगात सर्वात मोठी अमली पदार्थांची तस्करी करणारा म्हणून ऐल चापोचा समूह आहे. मेक्सिकोच्या ज्या भागात हे भुयार आढळले तिथे याच गँगचा प्रभाव आहे. मेक्सिकोत हे भुयार ऑगस्ट 2019 सालीच आढळून आले. भुयाराच्या प्रवेशाचे धागेदोरे मेक्सिको व अमेरिकेच्या प्रशासनाने मार्गक्रमण करत 29 जानेवारी रोजी जाहीर केले. काही महिन्यांपूर्वी ऐल चापोच्या मुलाला मेक्सिकोत अटक झाली होती, मात्र त्याची लगेच सुटका करण्यात आली. मेक्सिकोतील अमली पदार्थांचे तस्कर फक्त अमेरिकेतून वर्षाला 19 ते 29 अब्ज डॉलर इतकी प्रचंड रक्कम कमावतात.

अमेरिका मेक्सिको सीमारेषा जवळजवळ दोन हजार मैल लांब आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया, न्यू मेक्सिको, ऍरिझोना, टेक्सास राज्याला लागून हा प्रदेश आहे. यापैकी 700 मैल सीमेला तारांचे कुंपण अमेरिकेने घातले आहे. हजारो कॅमेरे, सीमा सुरक्षा दल यांची गस्त, जमिनीखाली लावलेले सेन्सर, विमाने, ड्रोन हे सुरक्षा कवच अस्तित्वात आहे. बिल क्लिंटन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना अमली पदार्थ व घुसखोरी रोखण्यासाठी सॅन दिएगो व तीजुआनादरम्यान 14 मैलांची सीमा बंद करण्यात आली. उर्वरित 700 मैल कुंपण पूर्णत्वास जायला 2011 साल उजाडावे लागले. अमेरिकेत मेक्सिकन यांची संख्या 11.6 दशलक्ष असल्याची माहिती आहे. त्यातील निम्मे हे अनधिकृतपणे वास्तव्यास आहेत. अनधिकृत मेक्सिकन नागरिकांची संख्या व अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी 55 फूट उंचीची एक हजार मैल भिंत उभारण्याचे ट्रम्प यांचा मनोदय आहे. त्यासाठी आर्थिक, पर्यावरणाचे प्रश्न उभे ठाकले आहेत. पर्वतीय, अतिदुर्गम भागात ही भिंत उभारणीसाठी 40 अब्ज डॉलर खर्च अपेक्षित आहे. ही भिंत उभारण्याचा खर्च उचलण्यास मेक्सिको सरकारने नकार दिला आहे. अमरिकेच्या संसदेने यासाठी केवळ 1.6 अब्ज निधीची तरतूद केली जी फारच कमी आहे. त्यामुळे भिंत उभी होईस्तोवर ट्रम्प यांनी सीमेवर अतिरिक्त सुरक्षा नियुक्त केली, परंतु त्याचा हवा तसा उपयोग होताना दिसत नाही.

2017 च्या प्रकाशित बातमीनुसार अमेरिकेच्या अमली पदार्थविरोधी विभागाने 2007 पासून 3.2 अब्ज डॉलर इतकी रक्कम जप्त केली आहे. ही जप्ती रोख रकमेच्या स्वरूपात केवळ संशयित अमली पदार्थ तस्कर संबंधित व्यक्तीकडून केली गेली आहे. त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. अमेरिकेतील अमली पदार्थविरोधी कायद्यात तशी तरतूद असल्याने अशी जप्ती कायदेशीर ठरते. अमली पदार्थविरोधात अमेरिका सरकार 51 अब्ज डॉलर प्रतिवर्ष खर्च करते. जगात अनेक यशस्वी मोहीम राबविणाऱया अमेरिकेचे अमली पदार्थ व तस्करांच्या विरोधातील प्रयत्न कमी पडताहेत असेच प्रकर्षाने दिसून येते. ट्रम्प यांचा सीमेवर भिंत उभारण्याचे प्रयत्न असले तरी तस्करांनी जमीन पोखरून अमेरिकेच्या सुरक्षेला भुयारी मार्गाने सीमेपार सुरुंग लावायला सुरुवात केलीच आहे. भिंत उभी राहीलही, परंतु अमेरिकेची जमीन ठिसूळ होऊ लागल्याचे चित्र पुसले जाणार नाही.

– [email protected]