साडेचारशे विहिरींचा गैरव्यवहार; दोषींवर कारवाई करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
well

तालुक्यात 437 विहिरींचा लाभ देण्याच्या योजनेत मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. त्याची खरी माहिती घेऊन दोषींवर कारवाई करण्यात येईल. पंचायत समितीचा कारभार पारदर्शी आणि स्वच्छपणे केला जाईल. तालुक्यात विकासकामे राबवून सर्वत्र समान विकास केला जाईल, अशी माहिती सभापती विजय पाटील यांनी बैठकीनंतर दिली. धुळे पंचायत समितीची पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवारी झाली. या वेळी नवनिर्वाचितांचे प्रशासनातर्फे स्वागत करण्यात आले. मात्र या सभेला पत्रकारांसह छायाचित्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला.

धुळे पंचायत समितीची निवडणूक झाल्यानंतर पहिली सर्वसाधारण सभा 14 फेब्रुवारीला दुपारी झाली. सभापती विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. व्यासपीठावर उपसभापती विद्याधर पाटील, गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, गौतम सोनवणे आणि इतर विभागप्रमुख उपस्थित होते. नवनिर्वाचित सभासदांचे प्रशासनातर्फे स्वागत करण्यात आले. सभेचे कामकाज सुरू होताच सभापती विजय पाटील यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधी आणि छायाचित्रकार आणि सदस्यांच्या नातेवाईकांना सभागृहाबाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर केवळ सदस्य आणि प्रशासनातील अधिकाऱयांना सोबत घेऊन सभागृहात चर्चा झाली. सभेचे कामकाज संपल्यानंतर सुमारे दीड तासाने सभापती विजय पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पारदर्शी कारभार करण्याचा दावा होत असताना प्रसारमाध्यमांना बाहेर का काढण्यात आले, असा प्रश्न काही माध्यम प्रतिनिधींनी उपस्थित केला.