
नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (NRC) विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीतील शाहीन बागमध्ये आंदोलन सुरू आहे. यामुळे या भागातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये गाजलेला हा मुद्दा आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेला सार्वजनिक रस्ता खोलण्यात यावा यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर सोमवारी सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक रस्ता ठप्प करणाऱ्या शाहीन बाग येथील आंदोलकांना झापले.
Supreme Court asks who can be appointed to go to persuade/talk to Citizenship Amendment Act protesters from Shaheen Bagh. Names of Senior Advocate Sanjay Hegde and Sadhana Ramachandran, came up during the hearing for being appointed as an interlocutor to talk to the protesters. https://t.co/wgbHnVif4w
— ANI (@ANI) February 17, 2020
सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, दिल्ली पोलीस आणि सरकारला शाहीन बागमधील आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्याचे निर्देश दिले. तसेच नियमानुसार आंदोलनाची जागा जंतर-मंतर आहे, असेही सर्वोच्च न्यायालयाने यावेळी नमूद केले. हा मुद्दा जनजीवन ठप्प करण्याच्या निगडीत आहे. विरोधाच्या नावाखाली सर्व लोक रस्त्यावर उतरू लागले तर काय होईल? असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला. यावेळी पुढील सुनावणी 24 फेब्रुवारीला होईल हे देखील स्पष्ट केले.
The Supreme Court has fixed the matter for further hearing on Monday, 24th February. https://t.co/xVPYJATGdP
— ANI (@ANI) February 17, 2020
लोकांना आपला आवाज समाजापर्यंत पोहोचण्याचा अधिकार आहे. आम्ही लोकांच्या अधिकारांविरोधात नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे. परंतु ही समस्या दिल्लीतील वाहतूकीसंदर्भात आहे. तुम्ही दिल्लीलाही ओळखता आणि दिल्लीच्या वाहतूकीलाही. त्यामुळे जर प्रत्येक व्यक्ती रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागला तर काय होईल? हा मुद्दा जनजीवन ठप्प करण्यासंबंधी असल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने यावेळी म्हटले. तसेच अधिकार आणि कर्तव्यामध्ये संतुलन राखणे ही देखील आपली जबाबदारी आहे, असेही न्यायालयाने म्हटले. ज्येष्ठ वकील संजय हेगडे यांनी शाहीन बाग आंदोलनकर्त्यांशी संवाद साधावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. यावेळी संजय हेगडे यांनी माजी न्यायाधीश कुरियन जोसेफ यांनाही सोबत येण्याची मागणी केली.
नोएडा-दिल्ली वाहतूकीवर परिणाम
शाहीन बागमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामुळे 13ए रोड हा पूर्णपणे बंद आहे. हा रस्ता दिल्ली आणि नोएडाला जोडतो. रस्ता बंद झाल्यामुळे नोएडा आणि दिल्लीतील वाहतूकीवर परिणाम झाला असून लोकांना दुरचा रस्ता अवलंबवावा लागत आहे. यामुळे अधिक वेळ, पैसे आणि पेट्रोल-डिझेलही लागत आहे. यामुळे लोकांना प्रचंड मनस्ताप होत आहे.
























































