दिल्लीत शिवजयंती ‘राष्ट्रोत्सव’ म्हणून साजरा करणार – खासदार संभाजीराजे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव हा केवळ महाराष्ट्रापुरता किंवा मराठी लोकांपुरता मर्यादित न ठेवता तो संपूर्ण राष्ट्राचा उत्सव झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशाचे प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांचे स्वराज्य हे जनतेचे सुराज्य होते. खऱ्या अर्थाने संपूर्ण देशवासीयांच्या मनावर आजही शिवरायांचं अधिराज्य कायम आहे. पिढ्यांवर चांगले संस्कार करण्यासाठी आपल्याला शिवरायांचा इतिहास नवीन पिढीला शिकवावा लागेल. दिल्लीत शिवजयंती उत्सव ‘राष्ट्रोत्सव’ म्हणून साजरी करणार असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.

शिवजयंती राष्ट्रोस्तव समिती व अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती यांच्यावतीने 19 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात शिवजयंती साजरी करण्यात येत आहे, खासदार संभाजीराजे यांनी ही माहीती दिली. छत्रपती शिवरायांना जयंती निमित्त अभिवादन करण्यासाठी पोलंड, बुल्गेरीया, स्पेन, रोमानिया, चीन, इजिप्त, कँनडा, ट्युनिशियाश, सायप्रस या देशाचे राजदूत उपस्थित राहणार आहेत. खासदार संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली राजधानी दिल्ली येथे गेल्या दोन वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येते. यावर्षी शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदन येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शाहिरी कार्यक्रम, रणवाद्य वादन, लेझीम पथक, शिवकालीन युद्धकला, तुतारी वादन आदींच्या गजरामध्ये शिवजन्मकाळ साजरा होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार व विचार जगभर पसरावेत व सर्व देशांनी त्यांचे आचरण करावे यासाठी विविध देशांच्या राजदूतांना आमंत्रित केले असून ते शिवछत्रपतींना अभिवादन करणार आहेत. दिल्लीत साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती सोहळ्याच्या माध्यमातून महाराजांचा गौरवशाली इतिहास जगभरात पोहचवण्यासाठी हा कार्यक्रम होत आहे. महाराष्ट्राच्या मातीत शिवराय घडले त्या मातीत रुजलेल्या संस्कृतीचे दर्शन दिल्लीकरांना घडवण्यात येणार आहे. पोवाडे, ध्वज पथक, ढोल ताशा पथक, हलगी पथक, लेझीम पथक अशा अनेक पारंपरिक वाद्यांनी दिल्ली बहरून जाणार आहे. त्याचबरोबर शिवकालीन युद्धकला , मर्दानी खेळ यांचेही सादरीकरण होणार आहेत.