
एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगाव हे दोन वेगळे विषय असून एल्गारचा तपास केंद्र सरकारने काढून घेतला असला तरी दलित बांधवांशी संबंधित असलेला भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास केंद्राकडे कदापि देणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी स्पष्ट केले. रत्नागिरी जिह्यात नाणार रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही म्हणजे नाहीच, असेही सांगत त्यांनी नाणारवासीयांना आश्वस्त केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण दौऱ्यात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्याची आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी आढावा बैठकीत आलेले सर्व स्थानिक मुद्दे मार्गी लावण्यास सरकार प्रयत्नशील आहे असे सांगितले. केंद्र सरकारने आणलेला सीएए कायदा तसेच दर दहा वर्षांनी होणाऱया एनपीआर जनगणनेला काहीच हरकत नसल्याचे सांगताना उद्धव ठाकरे यांनी एनआरसीबाबत मात्र संभाव्य धोके लक्षात घेण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.
जाहिरात आली म्हणजे भूमिका बदलली असे नाही…
नाणार रिफायनरी प्रकल्पाची जाहिरात दैनिक ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्याबाबत पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘‘शिवसेनेचे धोरण आणि निर्णय मी ठरवतो आणि ते ‘सामना’मधून मांडले जातात. कोणताही जाहिरातदार शिवसेनेची भूमिका ठरवत नाही. जाहिरात आली म्हणजे शिवसेना बदलली असे होत नाही. अशा वेगवेगळय़ा जाहिराती रोज येत असतात. रिफायनरीची जाहिरात आहे तशी बद्धकोष्ठतेचीही आहे. नाणारबाबत शिवसेनेची भूमिका जी पूर्वी होती तीच आजही कायम आहे. नाणार नाही म्हणजे नाहीच.’’
याप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री ऍड. अनिल परब, उच्च तंत्रशिक्षण मंत्री व सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, वैभव नाईक, योगेश कदम, राजन साळवी, शेखर निकम व हुस्नबानू खलिफे, मुख्य सचिव अजोय मेहता, मिलिंद नार्वेकर, सिंधुदुर्ग संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, संदेश पारकर आदी उपस्थित होते.
- विकास प्रकल्पांमध्ये येणाऱया देवस्थान समित्यांच्या जमिनीचे हस्तांतरण सुलभरीत्या व्हावे म्हणून महिनाभरात धोरणात्मक निर्णय घेणार
- पर्यटन स्थळांच्या विकासासाठी एकत्रित आराखडा तयार करणार
- रत्नागिरीला पर्यटन जिल्हा घोषित करण्यासाठी लोकप्रतिनिधी, पालकमंत्र्यांची बैठक
- राजापूर, चिपळूणमध्ये पुराचे पाणी अडवण्यासाठी संरक्षक भिंत उभारण्यास मान्यता
- रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेत रत्नागिरी, सिंधुदुर्गला प्राधान्य
- रस्ते अपघातातील जखमींसाठी 108 नंबर ऍम्ब्युलन्सबरोबरच अन्य व्यवस्थाही निर्माण करणार
- रत्नागिरी-रायगडला जोडणारा पूल बांधकाम विभागाच्या निधीतून पूर्ण करणार
- निवळी घाट व अन्य रस्त्यांच्या कामाला प्राधान्य देणार
चिपी विमानतळावरून 1 मेला उड्डाण
चिपी विमानतळावरून येत्या 1 मे रोजी पहिले विमान उड्डाण करेल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. चिपी विमानतळाच्या कामाची आपण पाहणी केली असून बरेचसे काम पूर्ण झाले आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. उर्वरित काम तत्काळ पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशा सूचनाही त्यांनी कंपनीचे अधिकारी आणि प्रशासनातील संबंधित अधिकाऱयांना केल्या. कामाची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
सिंधुरत्न समृद्धी योजनेची घोषणा
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्याच्या विकासासाठी ‘सिंधुरत्न समृद्धी योजने’ची घोषणा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. सिंधुदुर्ग जिह्याला एक वेगळी ओळख असून ती बदलण्यापेक्षा विकास काय करता येईल याचा विचार शासन करत आहे असे ते म्हणाले. या योजनेमध्ये आरोग्य आणि पर्यटनासह काजू व आंबा पिके, घर बांधणी, नळपाणी योजना यांचा विचार करण्यात आला आहे. रत्नागिरी जिह्यासाठी रुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले. मत्स्य दुष्काळाला कारणीभूत ठरणारी एलईडी मासेमारी रोखण्यास कायदा करण्यात येईल, असेही त्यांनी पुढे सांगितले.






























































