सोलापूर शहर पाणीपुरकठा योजनेसाठी 15 दिवसांत 110 किलोमीटर जमिनीचे सीमांकन करा-उपमुख्यमंत्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उजनी धरणातून सोलापूर शहराला पाणीपुरवठा योजनेसाठी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त तसेच संबंधित सर्व यंत्रणांनी येत्या 15 दिवसांत 110 किलोमीटर जागेचे सीमांकन करण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. सोलापूर शहर पाणीपुरवठा योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.

सोलापूरच्या पाणीपुरवठा योजनेसाठी शासन आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देईल. उजनी जलाशयजवळ पंप हाऊस क जॅकवेल बांधण्यासाठी जलसंपदा विभागाने 0.25 हेक्टर जागा त्वरित महानगरपालिकेकडे हस्तांतरित करावी. जमिनीचे सीमांकन पूर्ण झाल्यानंतर भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. उजनी धरणातून सोलापूर शहराला पाणीपुरवठा करताना अनेक ठिकाणी ही भूमिगत पाइपलाइन शेतकऱयांच्या शेतातून जाणार आहे. त्यामुळे शेतकऱयांना विश्वासात घेऊन या पाईपलाईनचे काम करावे व शेतकऱयांना नियमानुसार नुकसानभरपाई देण्यात यावी असे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिले. या बैठकीस राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सोलापूर जिह्याचे पालकमंत्री दिलीप कळसे-पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त दीपक तावरे व अन्य अधिकारी उपस्थित होते.