हिंदमाता परिसरात पाण्याचा निचरा होणार झटपट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील सखल भाग असलेल्या हिंदमाता परिसरात या पुढे पावसाळय़ात पाणी साचणार नाही. मुंबई महानगरपालिकेने हिंदमाता परिसरातील 7 किलोमीटर लांबीच्या पर्जन्य जलवाहिन्यांच्या सक्षमीकरण आणि पुनर्बांधणीचे काम हाती घेतले असून त्यामुळे दर तासाला 50 मिलिमीटर इतक्या वेगाने पाण्याचा निचरा होणार आहे. वाहिन्यांच्या सक्षमीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून त्यामुळे स्थानिक रहिवाशांसह मुंबईकरांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

पावसाचे बदललेले चक्र, अचानकपणे एकाच दिवशी महिनाभराचा पडणारा पाऊस आणि त्याचवेळी समुद्राला आलेल्या भरतीमुळे मुंबईतील अनेक सखल भागांत पाणी साचते. त्याचा फटका हिंदमाता परिसरालाही बसतो. हिंदमाता परिसरात पाणी साचू नये म्हणून 2017 पासून पालिकेने सूक्ष्म नियोजन केले. या नियोजनामुळे दर तासाला 25 मिलिमीटर पाण्याचा निचरा केला जात होता, मात्र आता हिंदमाता परिसरातील 7 किलोमीटर लांबीच्या पर्जन्य जलवाहिन्यांच्या सक्षमीकरण आणि पुनर्बांधणीची सर्व कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. सक्षमीकरण आणि पुनर्बांधणीच्या या कामात तब्बल 8 हजार 202 फूट लांबीच्या (सुमारे 2.5 किलोमीटर लांबी) वाहिन्यांच्या पुनर्बांधकामाचा आणि अतिरिक्त वाहिन्यांच्या बांधकामाचाही समावेश आहे.

सक्षमीकरण असे होणार

7 किलोमीटर लांबीच्या पर्जन्य जलवाहिन्यांचे सक्षमीकरण आणि पुनर्बांधणी करताना या वाहिन्यांच्या बांधकामाचा आकार उताराकडे वाढता ठेवण्यात येणार आहे. एक पर्जन्य जलवाहिनी दुसऱया वाहिनीशी जोडताना दुसऱया पर्जन्य जलवाहिनीची क्षमता वाढेल अशा प्रकारे बांधकाम करण्यात येणार आहे. सुधारित आरेखनांप्रमाणे याचे बांधकाम सुरू असून पाणी वाहून नेण्याची आणि पाण्याचा निचरा करण्याची क्षमता वाढणार आहे.

या भागांनाही होणार फायदा, बी. जे. देवरुखकर मार्ग ते मडकेबुवा चौक

एफ/दक्षिण विभागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाजवळच्या बी. जे. देवरुखकर मार्ग आणि मडकेबुवा चौक या दरम्यान 750 मीटर लांब आणि 900 मिमी रुंद व 1200 मिमी उंची असणाऱया दोन ब्रिटिशकालीन पर्जन्य जलवाहिन्या आहेत. त्यांची पुनर्बांधणी हाती घेण्यात आली असून बॉक्स ड्रेन प्रकारची पर्जन्य जलवाहिनी या ठिकाणी बांधण्यात येत आहे. हे काम 90 टक्के पूर्ण झाले असून त्यामुळे या परिसरातील पाण्याचा निचरा दुप्पट वेगाने होणार आहे.

लालबाग पोलीस चौकी ते श्रावण यशवंते चौक

एफ/दक्षिण विभागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील लालबाग पोलीस चौकी ते श्रावण यशवंते चौकातील जुन्या पर्जन्य जलवाहिनीजवळ 1800 मिमी व्यासाची अतिरिक्त पर्जन्य जलवाहिनी बांधण्यात येत आहे. या पर्जन्य जलवाहिनीसाठी ‘मायक्रो टनेलिंग’ पद्धतीने जमीन पोखरून बोगदा तयार करण्यात आला आहे. याचेही काम 90 टक्के पूर्ण झाले आहे.

एमडी कॉलेज परिसर

महर्षी दयानंद महाविद्यालय जंक्शन ते साईबाबा मार्ग जंक्शन या दरम्यान असलेल्या भूमिगत पर्जन्य जलवाहिनीच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले असून ही जलवाहिनी सुरुवातीला 1200 मिमी व्यास, नंतर 1400 मिमी व्यास आणि 1800 मिमी व्यास अशाप्रकारे उताराकडे वाढत्या आकारात बांधण्यात येणार आहे, मात्र हे काम 2021 पर्यंत पूर्ण होणार आहे.