‘राष्ट्रवाद’ शब्दाचा वापर करू नका! सरसंघचालक मोहन भागवत यांनी टोचले कान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंरचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रवाद या शब्दावरून स्वयंसेवकांचे कान टोचले आहेत. राष्ट्रवाद (nationalism) या शब्दाचा थेट संबंध हिटलर आणि नाझीवाद याच्याशी असल्याने याचा उल्लेख टाळा असे आव्हान मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना केले. झारखंडमधील रांचीतील मोहराबादी येथे रामदयाल मुंडे फुटबॉल मैदानावर आयोजित ‘संघ समागम’ या कार्यक्रमामध्ये उपस्थित स्वयंसेवकांना संबोधित करताना मोहन भागवत यांनी हे विधान केले आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

राष्ट्रवाद (nationalism) या शब्दाचा वापर करू नका. राष्ट्र (Nation) म्हटले तरी चालेल.. राष्ट्रीय (national) म्हटले तरी चालेल… राष्ट्रीयत्व (nationality) म्हटले तरीही जालेल.. परंतु राष्ट्रवाद शब्द वापरू नका. कारण याचा थेट संबंध हिटलर आणि नाझीवाद याच्याशी आहे, असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, हिंदुस्थानला शक्तीशाली बनवण्याची जबाबदारी हिंदुंची अधिक आहे. हिंदु हिंदुस्थानातील सर्व धर्माचे प्रतिनिधित्व करतो आणि त्यांना एकमेकांशी जोडतो. हिंदुस्थानला विश्वगुरू बनवणे हेच सर्वांचे लक्ष्य असायला हवे. यावेळी त्यांनी तिकीटाच्या आशेने संघात येणाऱ्या लोकांनी शाखेपासून दूर रहावे, असा टोलाही लगावला. येथे आकस, लालचीपणा नाही. कोणतेही पद मिळवण्यासाठी आरएसएसमध्ये सहभागी झालेल्यांना संघात जागा नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

निसर्गाशी खेळू नका
निसर्गाला मानवाने आपला गुलाम समजू नये. मानवाने आतापर्यंत निसर्गाचे खूप नुकसान केले आहे. निसर्गाने आपल्याला बनवले आहे अशी आपली संस्कृती शिकवते, त्याचा आदर करा. आपणही निसर्गाला काहीतरी देणे लागतो. प्रत्येकाने आपली जबाबदारी निभावली पाहिजे. निसर्गाशी खेळल्यावर काय होते हे आपण चीनमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरलच्या रुपाने पाहू शकतो, असेही सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.