
महिलांवरील अत्याचारांना पायबंद घालण्याच्या दृष्टिकोनातून कठोर कायदा आणण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. याचाच भाग म्हणून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने आज आंध्र प्रदेशचा दौरा केला. या दौऱयादरम्यान दिशा कायद्याची माहिती घेतल्यानंतर याचा अभ्यास करून आठवडाभरात हे पाच अधिकाऱ्यांचे पथक अहवाल सादर करणार आहे. या अहवालावर आधारित ‘दिशा’च्या धर्तीवर कडक कायदा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाणार आहे. या अधिवेशनातच हा कायदा मंजूर केला जाणार आहे.
‘दिशा’ कायद्याची माहिती घेण्यासाठी आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आंध्र प्रदेशला भेट दिली. भेटीदरम्यान त्यांनी मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी आणि गृहमंत्री मेखाथोटी सुचरिता आणि तेथील पोलीस महासंचालकांशी चर्चा करून ‘दिशा’ कायद्याची माहिती घेतली. लैंगिक अत्याचाराच्या गुह्यासाठी वेगाने खटला चालविणे, 21 दिवसांत निकाल देणे आणि गुन्हेगारास फाशीची शिक्षा देण्याची तरतूद या कायद्यात आहे. यामुळे अशा प्रकारच्या गुह्यांना मोठा पायबंद बसण्याची शक्यता आहे. या कायद्याची माहिती घेण्यासाठी आज देशमुख यांनी अपर मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, विशेष पोलीस महानिरीक्षक अस्वती दोरजे यांच्यासह आंध्र प्रदेशला भेट दिली.
या भेटीविषयी माहिती देताना गृहमंत्री म्हणाले, दिशा कायद्याविषयी सांगोपांग माहिती घेऊन अहवाल देण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीमती दोरजे यांच्या नेतृत्वाखाली 5 अधिकाऱयांचे पथक केले आहे. ते पुढील आठवडाभरात अहवाल देतील. त्यावर चर्चा करून मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय मांडण्यात येईल. तसेच अधिवेशनात याबाबतचा कायदा आणण्याचा प्रयत्न करू. या भेटीदरम्यान त्यांनी विजयवाडा येथे मुख्यमंत्री रेड्डी यांच्यासह आंध्र प्रदेशच्या महिला व बालविकास मंत्री तनेती वनिता, आंध्र प्रदेशच्या मुख्य सचिव नीलम साहनी, पोलीस महासंचालक गौतम सवांग यांच्याशी चर्चा करून कायद्याविषयी माहिती घेतली.





























































