
>> डॉ. विजया वाड
पूर्वग्रह मनात ठेवून आपण एखाद्या व्यक्तीचा अंदाज बांधत राहतो. पण प्रत्यक्षातील चित्र मात्र फार वेगळे असते.
आई, सगुणाबाईंवर लक्ष ठेवायला हवं.’’
‘‘का? काय झालं?’’ ‘‘त्या स्वयंपाक चांगला करतात, प्रश्नच नाही, पण त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल माझ्या मनात शंका आहे’’ कस्तुरी म्हणाली.
‘‘असं फटकन् बोलू नये बाळ.’’ ‘‘माझं खोटं वाटतं ना! आता तू चार दिवस बघच.’’ कस्तुरीच्या आवाजाला धार चढली. मग वैशालीने मुलीच्या समाधानासाठी सगुणाबाई आल्यावर आतबाहेर, आतबाहेर करायला सुरुवात केली. सगुणाबाई चार दिवसांनी म्हणाल्या, ‘‘काही हवं का ताईसाहेब तुम्हाला?’’ आपण पकडले गेलो असंही वाटलं. शरमल्यासारखं झालं.
‘‘मी काही उचलपाचल करते असं वाटतं का?’’ ‘‘बोलू स्पष्ट?’’ ‘‘बोला ना ताईसाहेब.’’ ‘‘कस्तुरी म्हणाली की…’’ वैशालीचं वाक्य कस्तुरीनं पुरं होऊ दिलंच नाही. ‘‘आई, मी म्हणाले ना, नाश्ता त्यांनाही कम्पल्सरी खायला लाव म्हणून!’’ वैशाली समजली, सावरली. स्वर बदलून म्हणाली, ‘‘तेच तर सांगायचंय. आमच्याकडे भीमाबाई होत्या त्या आमच्याच सोबत नाश्ता करायच्या, पण तुम्ही…’’ ‘‘मला नाही हो जात सकाळी. मी तो डबा घरी नेऊन खाते.’’ ‘‘तेच मला बरं वाटत नाही.’’ ‘‘जास्त नेते असं वाटतं का ताईसाहेब?’’ ‘‘अहो, काहीतरीच काय सगुणाबाई?’’ मायलेकी एका सुरात जोरात उद्गारल्या.
खरंच सगुणाबाई डब्यात नाश्ता नेतात म्हणजे जरा जास्तच नेत असतील असं का बरं वाटलं आपल्याला? जरा चार-सहा घास जास्त नेले तर किती ‘गरीब’ होणार आहोत आपण? काय काय मनात आलं वैशालीच्या नि स्वतःचीच शरम वाटली. सगुणाबाई जाताना म्हणाल्या, ‘‘मी निघू? आज थालीपिठं केलीयत. लोणी काढलंय हो विरजणाचं. दहा पोळय़ा, कस्तुरीचं आवडतं बैंगन-भरता, आमटी, साधं वरण-भात नि काकडीची कोशिंबीर बाबासाहेबांची आवडती. तुमच्यासाठी वाटीभर कढी केलीय हो.’’ जाताना म्हणाल्या मागे वळून, ‘‘पत्ता माझा दुभत्याच्या कपाटावर ठेवलाय. या लेख लिहून झाला की! याच हं!’’ तिला मोठं आश्चर्य वाटलं. आपल्या घरातली प्रत्येक बारीक वस्तू ज्या बाईस माहीत असते ती कुठे राहते, कशी राहते, काहीही ठाऊक नसावं आपल्याला? वैशालीनं आपला वृत्तपत्रासाठी तातडीनं लिहायचा लेख पूर्ण केला. तो झटपट स्कॅन करून ई-मेल केला आणि कस्तुरीला अभ्यास करायला सांगून ती बाहेर पडली. कार त्या उस्मान गल्लीत शिरेल? नको! रिक्षाच बरी! दारावर टकटक केलीन.
‘‘सगुणाबाई, मी आल्येय वैशाली’’, ‘‘याss दार लोटलंय नुसतं.’’ वैशाली समोर बघत राहिली. समोर एक विशीची मुलगी बसली होती. फतकल मारून. तिची मान वाकडी होत होती. सावरत नव्हती, पण ती अत्यंत आवडीनं थालीपिठं खात होती. सगुणाबाई भरवीत होत्या, ‘‘ही माझी विठूमाऊलीय बरं ताईसाहेब. ही सुखी तर मी सुखी. हिच्यासाठी आणते हो मी तो साजूक नाश्ता, पण मी नाही हो खात.’’ त्यांच्या चेहराभर आनंद आनंद होता. माणूस प्राप्त परिस्थितीत कसा आनंद शोधतो? असा? हे प्रश्न त्यांना पडले नव्हते.
























































