‘दम मारो दम’चे वय 21 होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वयाचे अठरावे वर्ष पूर्ण होण्याआधीच हातात सिगारेटचे थोटूक घेऊन शाळा-कॉलेजांबाहेरील चौकात उभ्या राहणाऱया तरुणाईला आता लगाम बसणार आहे. सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्याचे कायदेशीर वय 18 वरून 21 वर्षांपर्यंत वाढवण्याचा विचार केंद्रीय आरोग्य मंत्रालय करीत आहे. 21 वर्षांखालील मुलांना सिगारेट आणण्यासाठी दुकानात धाडणेही पालकांना महागात पडणार आहे.

अलीकडच्या काळात शाळा-कॉलेजची मुले मोठय़ा प्रमाणावर सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी गेली आहेत. मित्रांकडून दबाव तसेच फॅशनचा भाग म्हणून तरुणाई नशाबाज बनली आहे. याचा गांभीर्याने विचार करीत केंद्रीय आरोग्य मंत्रालय सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ कायद्यात (सीओटीपीए) दुरुस्ती करणार आहे. या दुरुस्तीसाठी मंत्रालयाने नेमलेल्या कायदेविषयक उपसमितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीनंतर उपसमितीने आरोग्य मंत्रालयाकडे विविध महत्त्वाच्या शिफारसी सादर केल्या आहेत. या शिफारसींच्या अंमलबजावणीमुळे नशाबाज तरुणाईचा टक्का कमी होईल, असा विश्वास आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱयांनी व्यक्त केला आहे.

‘ग्लोबल ऍडल्ट टोबॅको सर्व्हे’चा निष्कर्ष
‘ग्लोबल ऍडल्ट टोबॅको सर्व्हे’च्या आकडेवारीनुसार, आजच्या घडीला 19 टक्के पुरुष, 2 टक्के महिला आणि इतर प्रौढांपैकी 10.7 टक्के लोक सिगारेटची नशा करतात. तसेच 29.6 टक्के पुरुष, 12.8 टक्के महिला आणि इतर प्रौढांपैकी 21.4 टक्के लोक सिगारेटव्यतिरिक्त इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी गेले आहेत. याशिवाय 26 कोटी 70 लाख लोक इतर मार्गांनी तंबाखूचे सेवन करीत असल्याचे उघडकीस आले आहे.

आरोग्य मंत्रालय ही पावले उचलणार
– 21 वर्षांखालील मुलांना सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ दुकानातून आणण्यास सांगणारे आई-वडील गुन्हेगार ठरतील.

– प्रतिबंधित क्षेत्रात धूम्रपान करणाऱयांना सध्या 200 रुपयांपर्यंत दंड ठोठावला जातो. दंडाच्या या रकमेत वाढ केली जाणार आहे.

– सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांचा बेकायदेशीर व्यापार रोखण्यासाठी एक ट्रकिंगप्रणाली तयार केली जाणार आहे.

– तंबाखूजन्य पदार्थांच्या पाकिटावर बारकोड असेल. त्यामुळे प्रत्येक उत्पादन कायदेशीर मार्गांनेच बाजारात पोहोचेल. संबंधित यंत्रणांना याची शहानिशाही करता येईल.