रायजिंग स्टार्समध्ये पालिका विद्यार्थ्यांचा कलाविष्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

त्रिपुराचे होजागिरी लोकनृत्य, शास्त्र्ााrय-कथ्थक नृत्य, गायन अशा कलांबरोबरच कबड्डी, बास्केटबॉल, मल्लखांब, बॉक्सिंग, तायक्वाँदो अशा क्रीडा प्रकारांच्या दिमाखदार सादरीकरणाने हजारो रसिकांची मने जिंकली. निमित्त होते पालिका शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित ‘रायजिंग स्टार्स’ कार्यक्रमाचे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पालिकेच्या एक हजारांवर विद्यार्थ्यांनी यावेळी कला-क्रीडा गुण सादर केले.

पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या कला-क्रीडा गुणांना व्यासपीठ मिळावे म्हणून सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम वरळी येथे ‘रायजिंग स्टार्स-2020’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शेकडो विद्यार्थ्यांच्या मराठा बटालियनने सादर केलेली महाराष्ट्राची संस्कृती-परंपरा, ढोलताशाचा गजर, भगवे झेंडे यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी सादर केलेल्या ‘शिवराय जयघोष’ जल्लोषाला आदित्य ठाकरे यांच्यासह मान्यवरांनी उभे राहून मानवंदना दिली. यावेळी उपमहापौर ऍड. सुहास वाडकर, खासदार अरविंद सावंत, आमदार धीरज देशमुख, झिशान सिद्दिकी, योगेश कदम, शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक, विधी समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे, आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले, बाजार व उद्यान समिती अध्यक्ष उमेश माने, महिला व बाल कल्याण समिती अध्यक्षा हर्षला मोरे, माजी महापौर नगरसेवक प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर, नगरसेवक दत्ता नरवणकर, समाधान सरवणकर, साईनाथ दुर्गे, नगरसेविका श्रद्धा जाधव, स्नेहल आंबेकर, हेमांगी वरळीकर, प्रविणा मोरजकर, सईदा खान, युवासेना कोअर कमिटीचे अंकित प्रभू, इंदू सहानी, शिक्षणाधिकारी महेश पालकर आदी मान्यवरांसह विद्यार्थी-पालक उपस्थित होते.

मराठी शाळा बंद पडू देणार नाही – महापौर
पालिकेचे विद्यार्थी केवळ शिक्षणातच नव्हे तर कला-क्रीडा प्रकारांत राष्ट्रीय पातळीवर मुंबई महापालिकेचे नाव उज्ज्वल करीत आहेत, असे कौतुक महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले. विद्यार्थ्यांना आणखी दर्जेदार आणि अद्ययावत शिक्षण देण्यासाठी उपक्रम राबवणार असल्याचे सांगतानाच यापुढे मराठी शाळा बंद पडू देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी या वेळी दिली.