ड्रग्ज देऊन आपल्याला अनेक दिवस कोंडून ठेवले होते, त्यानंतर आपल्यावर बलात्कारही झाला अशी कैफियत हॉलिवूड गायिका ऐमी डफी हिने मांडली आहे. इन्स्टाग्राम पोस्ट लिहून तिने सारी हकीगत सांगितली असून आता सर्व काही ठीक असल्याचे तिने सांगितले.
डफीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, गेली अनेक दिवस मी गायब होते. मला ड्रग्ज दिले गेले. मला अनेक दिवस डांबण्यात आले होते. माझ्यावर बलात्कारही करण्यात आला. अनेक दिवस मला ही गोष्ट सांगायची होती. परंतु मी माझ्या दुःखात होते. या घटनेचा मला जबर धक्का बसला आहे. माझ्या पत्रकार मित्राने माझी खूप मदत केली. आता या संकटातून मी बाहेर पडली आहे. अनेकवेळा मी गात नव्हते. कारण माझं हृदय तुटले असताना मी गाऊ कशी? असा प्रश्न मला पडत होता. माझ्या मित्र मैत्रिणींनी मला या संकटातून बाहेर पडण्यासाठी खूप मदत केली म्हणून त्यांचे आभार.”
परंतु तिच्यावर अत्याचार कोणी केले याचा खुलासा तिने आपल्या पोस्टमधे केलेला नाही. आगामी काळात आपण चाहत्यांशी सोशल मीडियातून संवाद साधणार असल्याचे तिने सांगितले. तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील ते विचारा त्याची मी उत्तरे देईन असेही तिने सांगितले.
हॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक अॅरॉन कार्टर यानेही आपल्या सख्ख्या बहीणीने बलात्कार केल्याचे सांगितले होते. अॅरॉनची बहीण लेस्ली ही दुभंगलेल्या व्यक्तिमत्वाची होती. तिला मानसिक आजार होता. या आजारातून बरे होण्यासाठी ती औषध घ्यायची. परंतु हे औषध घेतल्यनांतर तिला खूप राग यायचा. रागाच्या भरात ती आपला सख्खा भाऊ अॅरॉनवर लैंगिक अत्याचार करायची. लेस्लीने जेव्हा अॅरॉनवर अत्याचार केले तेव्हा तो अल्पवयीन होता. दोन ते तीनवर्षे आपल्या बहीणीने आपल्यावर अत्याचार केल्याचे अॅरॉनने ट्विटरवर सांगितले होते. ड्रग्जच्या अतिसेवनामुळे लेस्लीचा २०१२ साली मृत्यू झाला.