
>> द्वारकानाथ संझगिरी
प्राचीन हिंदुस्थानी वास्तुशास्त्र आणि शिल्पकलेतला एक लपलेला काळा मोती मी मध्यंतरी पाहिला. मी ‘लपलेला’ एवढय़ासाठीच म्हटलं की, तो फार जणांना ज्ञात नाही. तो युरोपात असता तर, असा सजवला असता की जग तो पाहायला धावलं असतं. इंग्लंडमध्ये स्टोनहेज पाहायला नाही का धावत आपण? असो.
हा ‘काळा मोती’ खिद्रापूर नावाच्या एका गावात आहे. ते गाव कोल्हापूरपासून साधारण साठ किलोमीटरवर आहे. पाहायला प्रवेश शुल्क वगैरे काही नाही. आपण एका जुनाट दरवाजातून जुनाट वाडय़ात शिरतोय असं वाटतं आणि अचानक हा काळा मोती डोळय़ांसमोर येतो आणि मग डोळे त्यावरून हलत नाहीत.
हा काळा मोती म्हणजे खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर. किशोर टेंबे नावाच्या माझ्या मित्राने पाचगणीला शंकराचं एक दगडी देऊळ बांधले. ते शंकराच्या पिंडीच्या आकाराचं आहे. प्राचीन हिंदुस्थानी संस्कृतीतल्या वास्तुकलेशी नातं सांगणारं वगैरे आहे. त्या मंदिराच्या निर्मितीच्या वेळी तो कुणाच्या तरी सांगण्यावरून खिद्रापूरला गेला आणि मग खिद्रापूरच्या मंदिराबद्दल जो बोलायला लागला तो अजून थांबलेला नाही. त्यामुळे अलीकडे मी इचलकरंजीला कार्यक्रमाला गेलो होतो तेव्हा हा ‘काळा मोती’ पाहून घेतला. त्यानंतर मी बदामीला गेलो. तिथली मंदिरं, तिथल्या लेण्या पाहिल्या, पण हा काळा मोती बिंब होऊन डोळय़ांत बसला.
चला, पुढे जाण्याअगोदर मंदिराची जन्मकहाणी, दंतकथा, इतिहास वगैरे सांगतो. इतिहास आपल्याला मंदिराच्या जन्माचा काळ सांगतो. त्यामुळे त्या काळातल्या हिंदुस्थानी संस्कृतीचे प्रतिबिंब डोळय़ांसमोर उभं राहतं. चालुक्य सम्राट द्वितीय पुलकेशीने इ.स.च्या सातव्या शतकात कोपेश्वर मंदिर बांधलं. चालुक्य राजे तसे वैदिक धर्माचे, पण त्यांच्याकडे परधर्मसहिष्णुता होती. त्यामुळे जैन आणि बुद्धांना राजाश्रय होता. या कोपेश्वर मंदिराच्या जवळ जैन मंदिरसुद्धा आहे. जैन आणि बौद्ध धर्म ही तशी हिंदू धर्माची बंडखोर अपत्यं. पण या अपत्यांना चालुक्य राजांनी आपल मानलं. दुसऱया पुलकेशीने (इ.स. 609-642) या मंदिराच्या बांधकामाची सुरुवात केली, पण पल्लवाबरोबरच्या युद्धात दुसरा पुलकेशी धारातीर्थी पडला. त्यानंतर हे मंदिर अर्धवट बांधलेल्या अवस्थेत सहाशे वर्षे होते. त्यानंतर यादव सम्राट श्री सिंघणदेव याने कोपेश्वराचं मंदिर पूर्ण केलं. तोपर्यंत शिल्पकला आणखी जास्त पुढे गेली होती. त्यामुळे अजिंठा आणि वेरूळ येथील शिल्पकलेपेक्षा कोपेश्वर मंदिरात जास्त चांगली शिल्पकला आहे, असे या कोपेश्वर मंदिराचे अभ्यासक डॉ. रामचंद्र गोविंद चोथे यांना वाटतं ते खरं आहे. कारण छोटी छोटी शिल्पेही बारकाव्यांनी नटलेली दिसतात. अजिंठा-वेरूळचा काळ साधारण इ.स. पूर्व दुसऱया ते इ.स. नंतर आठव्या शतकाचा काळ. त्यानंतर कोपेश्वर मंदिर पूर्ण झालं. डॉ. चोथे म्हणतात, ‘‘अजिंठा इथल्या जगप्रसिद्ध चित्र पद्मपाणिच्या चेहऱयावरील भाव इथे अनेक मूर्तींतून प्रतीत होतात’’. हे पटतं. कोपेश्वर मंदिरातली शिल्प अधिक जिवंत वाटतात. त्या मंदिरावरच्या नृत्यांगनांमध्ये जादू होऊन प्राण फुंकले गेले तर सुंदर नृत्यांगना आपल्या समोर उभ्या राहतील असं वाटतं. आपण त्यांच्या सौंदर्याने घायाळ होऊ. एक शिल्प आळस देणाऱया ललनेचं आहे. त्यातलं तिचं शरीरसौष्ठव पाहून वाटतं की, देवाने एलिझाबेथ टेलरला तयार करताना तोच साचा वापरला.
या मंदिराची नासधूस झालेलीसुद्धा दिसते. ही नासधूस सत्तावीस वर्षे महाराष्ट्रात तळ ठोकून बसलेल्या औरंगजेबाने केली, असा एक कयास बांधण्यात येतो. अशी एक कथा सांगतात की, औरंगजेबाची मुलगी एकदा नदी ओलांडून तिथे आली. ती त्या मंदिरातली शिल्पकला पाहून वेडावली. ती तिथून हलेना. त्यामुळे चिडून औरंगजेबाने मंदिराची नासधूस करायची आज्ञा आपल्या सरदाराला दिली. नासधूस करण्यामागची खरी कथा आणि प्रेरणा काहीही असो, कला ही धर्मातीत असते हे काही मध्ययुगीन मुस्लिम राजे विसरले हे खरंय. स्थापत्य, शिल्प, चित्र वगैरे कला मंदिराच्या रूपात असो किंवा चर्च, मशिदीच्या, त्यांना धर्म नसतो, पण मध्ययुगीन काय किंवा आजच्या धर्मपिसाटांना हे कधी कळलंच नाही. त्यामुळे धर्माच्या नावाखाली कलेचा विध्वंस होतच राहिला.या मंदिरांना फक्त इतिहास नसतो. त्यांच्याशी निगडित एखादी दंतकथाही असते. तिचा संबंध अर्थातच पुराणाशी, रामायण, महाभारताशी असतो. या दंतकथेतून आपल्याला त्या प्रसूत झाल्या त्यावेळच्या समाजाची कल्पनाशक्ती कळते. त्या काळात विज्ञान प्रगत नसल्यामुळे अचाट, अफाट किंवा तोंडात बोटं घालायला लावणाऱया वास्तूची निर्मिती देवाने किंवा राक्षसाने केली असं वाटू लागतं. एक दंतकथा अशी आहे की, पांडव वनवासात असताना त्यांनी हे मंदिर बांधले. म्हणजे त्यांनी दैत्य किंवा राक्षसांकडून ते एका रात्रीत बांधून घेतलं. पहाटे कोंबडा आरवल्यावर ते बांधकाम तसंच टाकून गेले. आता ही बांधकामं अर्धवट टाकल्याची दंतकथा का निर्माण झाली असेल? कारण या देवळातल्या स्वर्गमंडपाला वर एक तेरा फूट व्यासाचं गोल असं भोक आहे आणि बरोबर त्याखाली एक त्याच व्यासाची गोल शिळा आहे. देशभरच्या मंदिरांमध्ये स्वर्गमंडपाला भोक, त्यातून थेट वर आकाश दिसणं ही गोष्ट अपवादात्मकच आहे. त्यामुळेच त्या भोकाखाली जी शिळा दिसते, ती तिथे बसवायची राहून गेली, अशी दंतकथा तयार झाली असावी, पण द्वारपालाची नितांत सुंदर शिल्पं पाहून कुणी आणखी एकाने कल्पनेच्या आकाशात भरारी मारली. ती अशी की, काम करणारे दैत्य जाताना एक तान्हे मूल सोडून गेली. ते मूल तिथे द्वारपाल म्हणून उभं राहिलं. ते दरवर्षी गव्हाच्या आकाराएवढं वाढतं. त्यामुळे ते एवढं मोठं झालंय.
अशाच दंतकथा देवळातल्या देवाबद्दलही आहेत. मुळात हे देऊळ फक्त कोपेश्वराचं म्हणजे शंकराचंच आहे ना? कारण तिथे धोपेश्वराचं म्हणजे विष्णूचं अस्तित्वही दिसतं. पुन्हा एक रंजक दंतकथा प्रसवली गेली. त्याबद्दल आणि मंदिरातल्या शिल्पकलेचं रसग्रहण पुढच्या वेळी!




























































