इतिहासप्रेमींसाठी खजिना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दुर्गेश आखाडे

लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने दुर्मिळ वस्तूंचा खजिनाच वस्तुसंग्रहालयाच्या माध्यमातून एकत्र आणला आहे. पुस्तकांबरोबरच जिज्ञासू, इतिहासप्रेमींची भूक भागविणारे हे संग्रहालय आहे. पुराश्मयुगीन हत्यारांपासून अगदी दोनपाचशे वर्षांतल्या वस्तूंचा दुर्मिळ ठेवा इथे पाहायला मिळतो.

लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे वस्तुसंग्रहालय चिपळूण येथील 155 वर्षांपूर्वीच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरातील वस्तुसंग्रहालयात अतिशय दुर्मिळ वस्तूंचा संग्रह करण्यात आला आहे. हा संग्रह इतिहासप्रेमींसाठी एक अनमोल खजिना आहे. लोकमान्य टिळक स्मारकाकडे पुस्तकांची तर श्रीमंती आहेच, पण त्यात आता भर पडलीय ती वस्तुसंग्रहालयाची. 2005 साली पूर आला तेव्हा लोकमान्य टिळक स्मारकातील पुस्तकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले होते. 40 हजार पुस्तके वाहून गेली होती, पण ग्रंथालयाच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा पुस्तके आणि दुर्मिळ ग्रंथांचा संग्रह करून आज पुन्हा ती भव्यता उभी केली आहे. तशीच मेहनत करून दुर्मिळ वस्तूंचा संग्रह करून त्या दुर्मिळ वस्तू वाचायला शिकवलं आहे.

लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने दुर्मिळ वस्तूंचा खजिनाच एकत्र आणलाय तो वस्तुसंग्रहालयाच्या माध्यमातून. पुस्तकांबरोबरच जिज्ञासू, इतिहासप्रेमींची भूक भागविणारे हे संग्रहालय. वाचन मंदिरातील पुस्तकात तुम्ही ज्या गोष्टी वाचल्या त्याच गोष्टी तुम्हाला प्रत्यक्षात दाखविणारी जणू प्रयोगशाळाच म्हणावी लागेल. दोन लाख वर्षांपूर्वी मानवी वापरातील पुराश्मयुगीन हत्यारांपासून कोकणी वापरातील गेल्या दोनपाचशे वर्षांतल्या विविध वस्तूंचा दुर्मिळ ठेवा तुम्हाला संग्रहालयात पाहायला मिळतो. संग्रहालयाचे प्रवेशद्वारच तुम्हाला ऐतिहासिक जगात घेऊन जाते. इतिहासप्रेमींसाठी हे प्रवेशद्वार आमंत्रण देत आहे. दोन लाख वर्षांपूवी अश्मयुगीन दगडी हत्यारे, हडप्पातील उत्खननात मिळालेल्या वस्तू, इनामगाव, तेर आदी ठिकाणच्या संशोधन, उत्खननात सापडलेली भांडी असा दुर्मिळ पुरातन वस्तूंचा खजिना दिसतो. इथल्या काही दगडी वस्तू, मातीची भांडी, खापऱया आपल्याला तब्बल किमान 12 लाख वर्षे आदम पुराश्मयुग, मध्य पुराश्मयुग, उत्तर पुराश्मयुग, इतिहासपूर्व, नवपाषाण, सिंधू संस्कृती, ताम्रपाषाण, महापाषाण… मागे घेऊन जातात. याशिवाय पहिल्या शतकातील इराणी कुंभ, सातवाहनकालीन जाते, शहरातील वीरेश्वर मंदिर परिसरात मिळालेली देवीची महिषासुरमर्दिनीस्वरूप मूर्ती, भोम, ता.चिपळूण येथील वाघजाई देवीची मूर्ती, बाराव्या शतकातले वीरगळ, कोरीव दगड, विठ्ठल रुक्मिणी मूर्ती, ढाल, तलवारी, तोफगोळा, भाला, जंबी, कटय़ार आदी शिवकालीन अस्त्र्ां, दगडाच्या ठोकळय़ात कोरलेला चारशे वर्षे पूर्वीचा गणपती, कलात्मक कंदील, दुसऱया महायुद्धात वापरलेली भूमापन दुर्बीण, वाळूचे घडय़ाळ, फोनचा प्रवास दर्शविणारे जुने लाकडी टेबलावरील, भिंतीवरील टेलिफोन, वैशिष्टय़पूर्ण रचनायुक्त बहिर्वक्र भिंग, तिबेटियन घंटा, कालबाह्य वजने, सायाळीच्या काटय़ापासून बनवलेली पेटी, दक्षिण ध्रुवावरील दगड, कोकणात मिळणारी अभ्रक, सिलिका, आयर्न ओव्हर, क्वॉर्टझ् , बॉक्साईट, जांभा अशी खनिजे, होकायंत्राची दिशा बदलवणारे दगड, जुना सारीपाटाचा खेळ वेगवेगळय़ा आकर्षक रचनेत मांडण्यात आले आहेत. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, माजी आमदार शिवाजीराव सावंत यांच्या संग्रहातील धोंडो केशव कर्वे, वि.स.खांडेकर, ना.सी.फडके, दत्तो वामन पोतदार, पां.स.साने, साने गुरुजी, दादासाहेब मावळणकर, सेनापती बापट, जयप्रकाश नारायण यांच्या सन 1940 दरम्यान घेतलेल्या स्वाक्षऱया येथे पाहता येतात. दोनशे वर्षेपूर्व ब्रिटीशकालीन, होळकर संस्थान, इंदूर, सांगली संस्थान, श्रीमंत सरकार गायकवाड बडोदे, जोधपूर सरकार यांचे स्टॅम्पपेपर, ‘ग्रामर ऑफ संस्कृत’ हे सन 1805चे कोलकात्यातून प्रकाशित झालेले पुस्तक, दोन आणे किमतीची भगवद्गीता प्रत, दोनशे वर्षे जुनी हस्तलिखिते, सन 1763 सालचे झाशी संस्थानचे जमाखर्चाचे कागद, सन 1834 साली पार्थिवेश्वराला दिलेल्या सनदेची मूळ प्रत, लोकमान्य टिळकांनी दि.13 फेब्रुवारी 1920 रोजी चिपळूणला पाठवलेल्या पत्राची प्रत, ‘मु. पो. चिपळूण बंदर’ असा उल्लेख असलेली ईस्ट इंडिया कंपनीची पोस्टकार्डे आपल्याला इतिहासात घेऊन जातात. दोन हजार वर्षांपूर्वीपासून अगदी स्वातंत्र्यपूर्व ब्रिटिश कालखंडापर्यंतची नाणी येथे पाहता येतात. ज्यात मौर्य, सातवाहन, कुषाणकाळ, शिलाहार, रोमन, पोर्तुगीज, डच, शिवकालीन, पेशवेकालीन, इंदूर संस्थान, नागपूर संस्थान, झाशी संस्थान, ग्वाल्हेर संस्थानची पुरातन नाणी, पहिल्या महायुद्धात मिळालेली सन्मान पदके, 12व्या शतकातील सोन्याची पद्मटंक आणि शिलाहारकालीन शतक नऊ ते अकरा डाळीच्या एका दाण्याच्या आकाराचे सोन्याचे फनम संग्रहालयाच्या खजिन्याचे मूल्य वाढवत आहेत. विचारपूर्वक तयार करण्यात आलेले कोकणातल्या खेडेगावातील स्वयंपाकघर, तिच्यातली भाकरी थापणारी महिला, आजूबाजूचे चूल, चिमटा, फुकणी, तांब्या, लाकडाचा पलेता, पाटा, वरवंटा, गरम पाणी तापवण्याचे तपेले, कंदील, लाकडाची विळी, रॉकेलचा दिवा हे साहित्य आपल्याला ग्रामीण लोकजीवनाचा नजारा दाखवते. त्यासोबत कोकणी वापरातल्या कणगी, पाणी तापवण्याचा बंब, हरीक दळायचे जाते, पातेली, काथवट, लाकडी मापटी, घिरट, उखळ, शंभर वर्षेपूर्व लाकडी पेटी, पंचपाळ, चौफुला, नारळाच्या करवंटीपासून बनलेले जेवण वाढायचे डाव, तांब्यापितळेचे हंडे, कळश्या यांसह कोकणी देवघरातील दोनशे वर्षेपूर्व प्रभावळ, समई, फुलदाणी, आरतीचे ताट, पंचपाळ, संपुष्ट, तेल घालायचे भांडे, करा दिवा, पंचदीप, पूजेची उपकरणे, रक्तचंदन विष्णुमूर्ती अशा अतिशय दुर्मिळ वस्तूंचा खजिना आपल्याला अनुभवायला मिळतो.इतिहासप्रेमींना अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी संग्रहालय उपयुक्त ठरत आहे.पर्यटकांनाही एक दालन उभे राहिले आहे.

वरच्या मजल्यावर तैलचित्रांचा विशेष संग्रह दिसतो. देशासाठी सर्वोच्च त्याग करणारी, देशाची कीर्ती जगभरात पोहोचवणारी अनेक नररत्ने कोकणाने दिली आहेत. कोकणातील सहा भारतरत्नांबरोबरच राज्यकारभार, लष्करी कामगिरी, वैचारिक नेतृत्व, समाजकारण, संस्कृती, इतिहास, संशोधन, शिक्षण, साहित्य, युद्धनीती, क्रीडा, अध्यात्म, नाटय़ संगीत आदी विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवणाऱया महान व्यक्तींची तैलचित्रं त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करत आहेत. वाचनालयाने तैलचित्रांतून भावी पिढीचे आदर्श त्यांच्यासाठी जतन केले आहेत. ही व्यक्तिचित्रे पाहताना प्रत्येक कोकणी माणसाला आपल्या लाल मातीचा अभिमान वाटेल. या दालनाला ‘सुरेश भार्गव बेहेरे व्यक्तिचित्र कलादालन’ असे नाव देण्यात आले आहे. महान व्यक्तींच्या कर्तृत्वाचा इतिहास वाचताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील जे तेज आहे ते आपल्याला या तैलचित्रांतून जाणवते.