
राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी शिवभोजन थाळी योजनेचे काम कसे सुरू आहे, याची माहिती घेण्यासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुरातील शिवभोजन थाळी केंद्राला भेट दिली. याच केंद्रात त्यांनी दुपारचे जेवण घेतले. महिनाभरापूर्वी 26 जानेवारीला या केंद्राचे उद्घाटन वडेट्टीवार यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर या केंद्राची स्थिती आणि जेवणाचा दर्जा बघण्यासाठी वडेट्टीवार यांनी शनिवारी या केंद्राला अचानक भेट दिली. केंद्राची पाहणी केल्यानंतर त्यांनी इथेच शिवभोजनाचा आस्वाद घेतला. या थाळीचे पैसेही त्यांनी दिले. या केंद्रातील जेवणाचा दर्जा पाहता सर्वसामान्यांना निश्चितपणे समाधान मिळत असेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.


























































