
सात महिन्यांपूर्वी सामान्य देहयष्टीच्या खेळाडूने देहभान विसरून आपल्या शरीरावर घेतलेली मेहनत यंदा संस्मरणीय ठरली. बॉडी वर्कशॉपच्या रसल दिब्रिटोने सर्वांना थक्क करणारे आपल्या पीळदार शरीराचे अद्भूत दर्शन घडवत शरीरसौष्ठव जगतातले ऑस्कर मानल्या गेलेल्या “स्पार्टन मुंबई श्री” किताबावर आपले नाव कोरले.जेतेपदाचे संभाव्य दावेदार असलेल्या सुशील मुरकर आणि निलेश दगडेवर रसलने मात केली . हवाई सुंदरी असलेल्या फॉरच्युन फिटनेसच्या रेणूका मुदलियारने दिपाली ओगले आणि डॉ. मंजिरी भावसार यांच्यावर कुरघोडी करत फिजीक स्पोर्टस् प्रकारात “मिस मुंबई”चे जेतेपद पटकावले तर अमला ब्रम्हचारीने आपल्या पीळदार शरीरयष्टीच्या जोरावर शरीरसौष्ठवात “मिस मुंबई”चा मान मिळविला. पुरूषांच्या फिजीक स्पोर्टसमध्ये अरमान अन्सारी आणि आतिक खान यांनी बाजी मारली.
बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव व फिटनेस संघटनेनेस्पार्टन मुंबई श्रीचा फिटनेस सोहळा अंधेरीच्या सेलिब्रेशन स्पोर्टस् क्लबच्या मैदानात हजारो क्रीडा शौकिनांच्या तुफान उपस्थितीत मोठ्या दणक्यात पार पाडला. एकंदर १२ गटात खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत रसल दिब्रिटोने उपस्थितांना तोंडात बोटे घालायला भाग पाडणारी अनपेक्षित कामगिरी करीत सोनेरी यश संपादले. शिवसेनेचे खासदार आणि शरीरसौष्ठवाचे आश्रयदाते शिवसेना नेते गजानन कीर्तीकर, शरीरसौष्ठव संघटनेचे दिग्गज मधुकर तळवलकर, विक्रम रोठे, अमोल कीर्तीकर, अजय खानविलकर, राजेश सावंत, सुनील शेगडे आणि या स्पर्धेचे मुख्य पुरस्कर्ते स्पार्टन न्यूट्रिशनचे सर्वेसर्वा डॉ. विक्रम चोक्सी आणि ऋषभ चोक्सी यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या स्पर्धेचे अभूतपूर्व आयोजनासाठी क्रीडाप्रेमी सुबोध मेनन, माजी भारत श्री श्याम रहाटे, सिद्धेश रामदास कदम यांच्यासह भारतीय आयुर्विमा महामंडळ, इएन न्यूट्रिशन, जीएनसी, हेल्थ बूस्टर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
जिद्दीला देवपण खाली येतो – रसल दिब्रिटो
माझे सोनेरी यश हे फक्त आणि फक्त माझे गुरू संजय चव्हाण यांचेच आहे. त्यांनी माझ्यासारख्या दगडाला अवघ्या सात महिन्यात सोनं करण्याचा चमत्कार करून दाखविला. त्यांनी मला पाहताच सांगितले होते, तू मुंबई श्री जिंकू शकतो, फक्त मी सांगेन तसंच करायचे. मग मी गेले सात महिने त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला. ते म्हणतील, तसंच केलं. आज मी जेव्हा स्वत:ला आरशात पाहतो, तेव्हा मलाच माझ्यावर विश्वास बसत नाहीय.मुंबई श्री नंतर आता महाराष्ट्र श्री आणि भारत श्री स्पर्धेतही मला सोनेरी यश मिळवायचेय आणि ते मी मिळवूनच माझे पुढचे ध्येय निश्चित करेन,असे रसल जेतेपदानंतर म्हणाला.
रेणूका मुदलियार : हवाई सुंदरी ते मिस मुंबई
स्पाईस जेट विमान कंपनीत ‘हवाई सुंदरी” म्हणून गेली नऊ वर्षे सेवा देत असलेल्या फॉरच्युन फिटनेसच्या रेणूका मुदलियारने फिजीक स्पोर्टस् प्रकारात कसलेल्या दिपाली ओगले आणि मंजिरी भावसारला अनपेक्षित धक्का दिला. आयुष्यात काहीतरी नाविण्य असावं म्हणून आपल्या नवऱयाच्या आग्रहाखातर तिने फिटनेसकडे लक्ष दिले. स्वतःही एक चांगला शरीरसौष्ठवपटू असलेल्या भारत जनौतीने रेणूकाला प्रोत्साहन देत तिला फिजीक स्पोर्टस् प्रकारात नशीब आजमविण्याचा सल्ला दिला. वर्षभरापूर्वी आपल्या देशातही बिकीनी घालून मुली आपलं फिजीक दाखवतात, याची कल्पनाही नसलेल्या रेणूकाला दंगलच्या आमीर खानप्रमाणे कोचगिरी करत तिच्या नवऱयाने दिला फिजीक स्पोर्टससाठी तयार केले. नवऱ्याने माझ्याकडून करून घेतलेली मेहनत आणि मला दिलेल्या प्रोत्साहनामुळेच मला आज बिकीनी घालून स्टेजवर मिरविण्याचे धाडस दाखवता आल्याची प्रांजळ कबूली फिजीक स्पोर्टस्च्या मिस मुंबई रेणूकाने दिली.

























































