क्रीडाक्षेत्रालाही कोरोनाची ‘लागण’,अनेक मोठमोठय़ा स्पर्धा होताहेत रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महामारी बनलेल्या ‘कोरोना व्हायरस’मुळे अवघे विश्व आता भयभीत झाले आहे. जगभरातील अनेक देशांमधील 85 हजारांहून अधिक लोकांना या जीवघेण्या व्हायरसची लागण झाली असून 2900 हून अधिक लोक या विषाणूचे बळी ठरले आहेत. ‘कोरोना’चा फटका अर्थातच क्रीडाक्षेत्रालाही बसला असून अनेक मोठमोठय़ा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. काही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

चीनमध्ये निर्माण झालेल्या कोरोना व्हायरसने जपान, कोरियासह तब्बल 55 देशांना कवेत घेतले आहे. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिकसह ऑलिम्पिक क्वालिफायर्स, फॉर्म्युला वन, बॅडमिंटन, टेनिससह अनेक मोठय़ा आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन संदिग्ध बनले आहे. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या देशांनी तर आपल्याकडील स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप रद्द
चीनच्या पूर्वेकडील जियांग्सू राज्यातील नैन्जिंग शहरात 13 ते 15 मार्च या कालावधीत वर्ल्ड ऍथलेटिक्स इनडोअर चॅम्पियनशिपचे आयोजन होणार होते, मात्र कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा 2021पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. उत्तर कोरियात एप्रिलमध्ये होणारी मॅरेथॉन आणि दक्षिण कोरियात होणारी मॅरेथॉनही रद्द करण्यात आली आहे.

फॉर्म्युला वन रेसबाबतही संदिग्धता
चायनीज ग्रॅण्ड प्रिक्स शर्यतीचे 19 एप्रिलला शांघायमध्ये आयोजन होणार होते, मात्र कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर या रेसबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे. याचबरोबर ऑस्ट्रेलिया ग्रॅण्ड प्रिक्स व बहरीन ग्रॅण्ड प्रिक्स या स्पर्धाही रद्द होण्याच्या मार्गावर आहेत.

…तर जपानची अर्थव्यवस्था कोलमडणार
‘कोरोना व्हायरस’मुळे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करावी लागली तर जपानची अर्थव्यवस्था कोलमडणार आहे. कारण जपानने आतापर्यंत ऑलिम्पिकच्या तयारीवर 12.6 बिलियन डॉलर्स खर्च केले आहेत. या स्पर्धेच्या आयोजनामुळे जपानच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर जपानमध्ये हजारो परदेशी नागरिक येणार असल्याने त्या दृष्टीने जपानने आपले भांडवल गुंतविले आहे, मात्र स्पर्धाच रद्द करावी लागली तर जपानची सर्व गुंतवणूक व्यर्थ जाईल. त्यामुळे या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे हे आता जिवाचा आटापिटा करीत आहेत.

ऑलिम्पिकचे आयोजन संकटात
काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या टोकियो ऑलिम्पिकसाठी जपानने कंबर कसली आहे. मात्र कोरोना व्हायरस जपानमध्येही दाखल झाल्याने ऑलिम्पिकचे आयोजन संकटात सापडले आहे. ‘मे महिन्यापर्यंत हा व्हायरस नष्ट झाला नाही तर नाइलाजाने टोकियो ऑलिम्पिक रद्द करण्यात येईल,’ अशी भीती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्य डिक पाऊंड यांनी व्यक्त केली आहे. मात्र डिक यांचे विधान आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघाचे (आयओए) अधिकृत विधान नाही, अशी सारवासारव जपानकडून करण्यात आली, मात्र कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारीमध्ये होणारे स्वयंसेवकांचे शिबीर जपानला दोन महिन्यांसाठी पुढे ढकलावे लागले आहे. त्यामुळे ऑलिम्पिकच्या आयोजनाबाबत संदिग्धता आहे एवढे नक्की.

अनेक बॅडमिंटन, टेनिस स्पर्धा रद्द
‘कोरोना व्हायरस’च्या पार्श्वभूमीवर जर्मन ओपन (3 ते 8 मार्च), व्हिएतनाम ओपन (24 ते 29 मार्च) आणि पॉलिश ओपन (26 ते 29 मार्च) या बॅडमिंटन स्पर्धांसह ऑलिम्पिक पात्रता फेऱयाही रद्द करण्यात आल्या आहेत. याचबरोबर चीन व रोमानिया यांच्यात 6 ते 7 मार्च या कालावधीत होणारी डेव्हिस चषक टेनिस लढत रद्द करण्यात आली आहे. 13 ते 19 एप्रिलदरम्यान होणारी डब्लूटीए शियान ओपन टेनिस स्पर्धाही खेळाडूंच्या सुरक्षेला प्राधान्य देताना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बॉक्सिंग, कुस्तीलाही फटका
वुहानमध्ये होणारी ऑलिम्पिक बॉक्सिंग पात्रता स्पर्धा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने अम्मानमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. आता ही स्पर्धा 3 ते 11 मार्च या कालावधीत होणार आहे. ‘जपान बॉक्सिंग कमिशन’ने मार्चमध्ये होणाऱया सर्व बॉक्सिंग स्पर्धा सरकारच्या सांगण्यावरून रद्द केल्या आहेत. याचबरोबर कुस्ती स्पर्धेलाही कोरोना व्हायरसचा फटका बसला असून किर्गिस्तानमधील बिश्केक येथे 27 ते 29 मार्च या कालावधीत होणारी आशियाई कुस्ती पात्रता स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. ही स्पर्धा आधी चीनमध्येच होणार होती, मात्र ती बिश्केकमध्ये स्थलांतरित करण्यात आली होती, मात्र कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे ही स्पर्धा अखेर रद्द करण्याचा निर्णय घेतला.