
जगभरात शेकडो बळी घेऊन अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला धोका पोहचवणाऱया ‘कोरोना’वर उपचार करण्यासाठी पालिकेने आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. यामध्ये पालिकेच्या चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयासह जोगेश्वरीच्या बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमध्येही जागा निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, कस्तुरबा रुग्णालयात आतापर्यंत आलेल्या सर्व दहा ‘कोरोना’ संशयितांच्या रक्त चाचण्या कोरोना निगेटिव्ह आल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
जीवघेण्या ‘कोरोना’ व्हायरसने चीन-हाँगकाँगसह काही देशांत धुमाकूळ घातल्यामुळे मुंबईतील विमानतळावर पालिकेच्या माध्यमातूनही परदेशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये ‘कोरोना’ संशयितांवर पालिकेच्या चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचार करण्यात आले. यामध्ये आतापर्यंत आढळलेल्या दहा संशयितांवर या ठिकाणी उपचार सुरू होते. या सर्व संशयितांचे ब्लड रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिली. कस्तुरबा रुग्णालयात सध्या कोरोना संशयितांवर उपचार करण्यासाठी 32 बेडची व्यवस्था तैनात ठेवण्यात आली आहे. यामध्ये दोन दिवसांत सरासरी एक ते दोन कोरोना संशयितांवर उपचार करण्यात येत आहेत. मात्र सुदैवाने आतापर्यंत आढळलेल्या सर्व संशयितांचे ब्लड रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आले आहेत.
…तर डॉक्टरांशी संपर्क साधा
विषाणू प्रजातीमधील ‘कोरोना’ची लागण झाल्यास सर्दी, ताप, खोकला असे त्रास सुरू होतात. उंट, मांजर अशा प्राण्यांमधून याचा प्रसार होतो. या आजारात श्वसनालाही त्रास होतो. न्यूमोनियासारख्या या आजारात मूत्रपिंडही निकामी होऊ शकते. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप अशा आजारांत पाच दिवस औषधोपचार करूनही आराम पडला नाही तर कस्तुरबा रुग्णालयात उपचार घ्यावेत, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
आता कस्तुरबातही ‘कोरोना’ चाचणी
मुंबईत सुरुवातीला आढळलेल्या ‘कोरोना’ संशयितांच्या रक्ताचे नमुने नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजी, पुणे येथे पाठवण्यात येत होते. या ठिकाणी ब्लड सॅम्पल पाठवल्यानंतर दुसऱया दिवशी रिपोर्ट मिळत होता. मात्र ‘कोरोना’चा धोका लक्षात घेता आता पालिकेच्या ‘कस्तुरबा’ रुग्णालयातही उपचार करण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे.




























































