
अस्मानी आणि सुल्तानीच्या संकटातून शेतकरी कायमचा बाहेर पडावा म्हणून ‘ठाकरे सरकार’ पावले टाकीत आहे. गेल्या पंधरा-वीस वर्षांत हजारो मल्हारी बटुळे कर्जबाजारी होऊन मरण पावले व हजारो प्रशांत अनाथ झाले. मल्हारी बटुळे यांना जीवन का संपवावे लागले? त्यांचा मुलगा प्रशांतला ‘अरे बळीराजा, नको करू आत्महत्या!’असे काव्य का सुचले? या प्रश्नांची उत्तरे राजकारण्यांनी शोधायची आहेत. सरकार फडणवीसांचे असो नाहीतर ठाकऱ्यांचे, अन्नदाता आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो. महाराष्ट्राने अस्वस्थ व्हावे असा हा प्रशांतचा हुंदका आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना सुखाचे दिवस यावेत, त्यांची चूल विझू नये, त्यांच्या चिंतांचे ओझे थोडे तरी कमी व्हावे यासाठी ‘ठाकरे सरकार’ झटत आहे, पण संयमाचा बांध तुटतो आणि शेतकरी आत्महत्या करतो असे घडू लागले आहे. आताही पुन्हा अवकाळी पावसाने मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपून काढले. गारपिटीसह कोसळलेल्या पावसामुळे शेतकरी हतबल झाला असून हातातोंडाशी आलेली पिके नष्ट झाली आहेत. एकही वर्ष असे जात नाही की अवकाळीचा तडाखा शेतात उभ्या पिकाला बसत नाही आणि शेतकऱयाचे होत्याचे नव्हते होत नाही. गेल्या वर्षी अतिवृष्टीने खरिपाचा हंगाम बुडाला. आता रब्बीचे पीक चांगले आले होते, बळीराजाच्या चेहऱयावर हसू फुलले होते, पण त्याला अवकाळी आणि गारपिटीची दृष्ट लागलीच आणि हसूची जागा आसूंनी घेतली. हे असेच सुरू आहे, त्यात शेतकरी भरडला जात आहे आणि आत्महत्येच्या कडय़ावर ढकलला जात आहे. शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या आत्महत्येच्या बातम्या आजही अधूनमधून येत आहेत. या ‘अधूनमधून’ येणाऱया बातम्याही कायमच्या बंद व्हाव्यात, बळीराजा अन्नदाता सुखाने जगावा असे कुणाला वाटणार नाही? नगर जिल्हय़ातील पाथर्डी तालुक्यात भारजवाडी गाव आहे. तेथील शेतकरी मल्हारी बाबासाहेब बटुळे यांनी आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण वेगळे नाही.
आतापर्यंत हजारो शेतकऱयांनी ज्या कारणासाठी आपले जीवन संपवले, त्याच नापिकी, कर्जबाजारीच्या कारणाने मल्हारी यांनी आपलेही जीवन संपवले, पण मल्हारी यांच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्र हळहळला तो त्यांच्या शाळकरी मुलाच्या वागण्याने. मल्हारी यांचा मुलगा प्रशांत तिसऱ्या इयत्तेत शिकतो. शाळेतील एका कार्यक्रमात त्याने एक कविता सकाळी ऐकवली. शेतकऱ्यांच्या कुटुंबांना धीर देणाऱया या कवितेचे बोल होते –
‘‘अरे बळीराजा, नको करू आत्महत्या!’’
शेतात कष्ट करूनही तुझ्या डोक्याला ताप
अरे बळीराजा, नको करू आत्महत्या!
पैसे नसूनही शाळेत शिकवता लेकरे
कसे उन्हात करतात शेती
पीक उगवणी करून मिळतात पैसे
शेती करूनही तुझ्या हाताला फोड
अरे बळीराजा, नको करू आत्महत्या!
प्रशांतने सकाळी ही कविता ऐकवली व रात्री तो झोपण्यासाठी बापाच्या कुशीत शिरला. सकाळी डोळे उघडले तेव्हा त्याचा बाप या जगात नव्हता. त्याने विष पिऊन जीवन संपवले होते. मल्हारी शेतीवाडी करून घरसंसार चालवत होते. त्यांनी कर्ज घेऊन ट्रक्टर विकत घेतला, पण बेमोसमी पावसाने पुन्हा एकदा शेतीचे नुकसान झाले व कर्ज कसे फेडायचे या धक्क्याने त्यांनी आत्महत्या केली. सुन्न करणारी ही घटना आहे. आतापर्यंत असे हजारो अन्नदाता मल्हारी आपण गमावले आहेत. असे मल्हारी ‘कच’ खाऊन मरतात तेव्हा पाठीमागे त्यांचा संसार, पोरेबाळे उघडय़ावर पडतात. आत्महत्या करणाऱया असंख्य माता-पित्यांची वेदना प्रशांतच्या कोवळय़ा मनावर परिणाम करून गेली. शेतकऱ्यांचे जगणे कठीण आहेच, तरीही त्याने मरणाचा मार्ग स्वीकारू नये यासाठी प्रशांतने त्याच्या कवितेतून व्यथा मांडली, पण त्याच्या शेतकरी बापाने त्याच रात्री पराभूत मनाने आत्महत्या करावी हा विचित्र योग आहे. शेतकऱयांनी आत्महत्या करू नये यासाठी सरकारने तीन महिन्यांत मोठे काम केले आहे.
नेते शेतकरी कल्याणाच्या घोषणा करतात, पण त्याच्या अंमलबजावणीबद्दल अनेकदा आक्षेप घेतले जातात. आकडे खरे की खोटे हे सरकारी यंत्रणेने तपासावे, पण 2019 मध्ये 2808 शेतकऱयांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्याआधी किती शेतकरी मरण पावले ते सरकारला आणि देवालाच माहीत, पण अस्मानी आणि सुल्तानीच्या संकटातून शेतकरी कायमचा बाहेर पडावा म्हणून ‘ठाकरे सरकार’ पावले टाकीत आहे. शेतकऱयांचे पीककर्ज दोन लाखांपर्यंत माफ झाले ही फक्त घोषणा नाही, तर कर्जमाफी झालेल्या शेतकऱयांची यादीच सरकारतर्फे प्रसिद्ध होत आहे. रोग जुना आहे, बळावला आहे, पण रोगी सुधारल्याशिवाय राहणार नाही ही आम्हाला पक्की खात्री आहे. गेल्या पंधरा-वीस वर्षांत हजारो मल्हारी बटुळे कर्जबाजारी होऊन मरण पावले व हजारो प्रशांत अनाथ झाले. प्रशांतच्या चटका लावणाऱया कवितेने त्याचे वडील मल्हारी यांचे दुःख पुन्हा वेशीवर टांगले इतकेच. त्यांच्या वेदनेचे राजकारण होऊ नये. महाराष्ट्रातील विरोधी पक्ष संवेदनशील असेल तर विरोधासाठी विरोध हे धोरण थांबवून अशा प्रश्नी गांभीर्याने चर्चा व्हावी व सगळय़ांनी मिळून शेतकरी जगेलच जगेल अशा धोरणासाठी काम करायला हवे. आज तरी तसे चित्र दिसत नाही. कर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी आहे. असंख्य शेतकऱयांना त्या मलमपट्टीचाही लाभ होत नाही. त्यात मल्हारी बटुळे आहेत. मल्हारी बटुळे यांना जीवन का संपवावे लागले? त्यांचा मुलगा प्रशांतला ‘अरे बळीराजा, नको करू आत्महत्या!’असे काव्य का सुचले? या प्रश्नांची उत्तरे राजकारण्यांनी शोधायची आहेत. सरकार फडणवीसांचे असो नाहीतर ठाकऱ्यांचे, अन्नदाता आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो. महाराष्ट्राने अस्वस्थ व्हावे असा हा प्रशांतचा हुंदका आहे.





























































