
ATM transactions in India एटीएम मशीनमधून सध्या 2000 रुपयांच्या नोटा मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. असे असतानाच आता एटीएममधून 100 रुपयांच्या नोटा देखील कमी निघत आहेत अशी माहिती समोर आली आहे. अर्थात 100 रुपयांच्या नोटा कमी मिळण्यामागे सरकारचा निर्णय नसून नोटांचा आकार ही खरी समस्या आहे. दैनंदिन व्यवहारासाठी 1 100 रुपयांची रोकड सर्वसामान्य जनतेला चांगली पडते. त्यामुळे एटीएममध्ये 100 रुपयांची मागणी अधिक असते. मात्र 100 रुपयांच्या नोटा कमी निघत असल्याने लोकांना त्रास सहन करावा लागत आहेत.
100 रुपयांच्या नोटा कमी निघण्यामागे त्याचा आकार हे कारण आहे. 100 रुपयाची जूनी नोट आणि नवी नोट असे दोन्ही चलनात आहे. 200, 500 आणि 2000 च्या नोटांबाबत मात्र असे नाही. 200 आणि 2000 ची नोट ही नवी आहे. तर 500 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद झाल्या असून नवीन फक्त नवीन नोटा चलनात आहे. मात्र 100 रुपयाच्या नोटे बाबत मात्र तसे नाही. 100 रुपयांची जुनी आणि नवी अशा दोन्ही नोटा या चलनात आहेत. त्या दोन्ही प्रकारच्या नोटांचा आकार निराळा आहे. त्यामुळे मशीनमध्ये या नोटा भरणे एक मोठी समस्या आहे. प्रत्येक बँकेचे एटीएम मशीन सांभाळणाऱ्या कंपनीला कोणते मशीन कोणत्या आकाराच्या नोटेला सपोर्ट करते याची नोंद ठेवावी लागते. टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार या नोंदींच्या आधारावरच कॅश व्हॅन लोड करावी लागले. तसेच बँकेत 100 रुपयांच्या नोटा कमी असल्यास त्या एटीएममध्ये टाकल्या जात नाही. बँकांचे अधिकारी आणि एटीएम व्यवस्थापन कंपन्यांचे म्हणणे आहे की ही समस्या सोडवायची असल्यास जुन्या नोटा या एटीएममध्ये टाकणे बंद केले पाहिजे. त्याची देवाण-घेवाण फक्त बँकेतच करण्यात यावी. एटीएममधून 100 रुपयांच्या केवळ नव्या नोटाच देण्यात याव्यात. असे निर्णय झाल्यास एटीएममशीन मध्ये केवळ नव्या नोटांचेच कॅसेट (खण) ठेवता येतील आणि काम अधिक सोपे, सुरळीत होईल.
एटीएम नेटवर्क प्रोव्हायडर कंपनी NCR चे व्यवस्थापकीय संचालक नवरोज दस्तूर यांनी सांगितले की, ‘100 रुपयाची नोट भरणे ही दरदिवसाची समस्या आहे. देशभरात 2.4 लाख एटीएममध्ये 100 रुपयाची कॅसेट असते. आमच्यासाठी मोठी समस्या ही असते की कोणत्या मशीनमध्ये कोणत्या प्रकारची नोट लोड करता येते याची माहिती ठेवणे, त्यानुसार त्याचे वेगळे नियोजन करणे. यामुळे प्रक्रिया लांबते’. देशभरातील सुमारे 20-25 टक्के एटीएम असे आहेत की ज्यामध्ये 100 रुपयांच्या नव्या नोटांची कॅसेट आहे. अन्य सर्व एटीएममध्ये 100 च्या जुन्या नोटा लोड कराव्या लागतात.























































