डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारला नवा साज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-पुणे मार्गावरील प्रवाशांचा प्रवास लवकरच आरामदायी आणि सुरक्षित होणार आहे. मुंबई-पुणे मार्गावरील डेक्कन आणि सिंहगड एक्सप्रेसला आधुनिक एलएचबी डबे बसविण्यात येणार आहेत. यापूर्वी इंद्रायणी एक्सप्रेस आणि कोकण मार्गावरील कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेसला सुरक्षित असे एलएचबी डबे बसविण्यात आले आहेत. तर ऐतिहासिक डेक्कन क्वीनलाही एलएचबी डबे बसविण्याची योजना असून तिच्या डायनिंग कारला तयार करण्यासाठी अहमदाबाद येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइनची मदत घेण्यात येणार आहे.

इंद्रायणी तसेच मुंबई-मडगाव मार्गावरील कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेसला एलएचबी डबे जोडल्यानंतर आता मुंबई ते पुणे मार्गावरील डेक्कन एक्सप्रेसला परवापासून एलएचबी तंत्रज्ञानाचे डबे बसविण्यात येणार आहेत. त्यानंतर सिंहगड एक्सप्रेसला एलएचबी डबे बसविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. यामुळे डेक्कन एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या 17 इतकी होणार आहे. या गाडय़ांचे पारंपरिक आयसीएफचे डबे काढून त्या जागी एलएचबी डबे बसविण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे.

चेन्नईच्या कारखान्यात निर्मिती

सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी अपघातरोधक व उच्च क्षमतेच्या एलएचबी डब्यांची निर्मिती चेन्नईतील इंटेग्रल कोच फॅक्टरीमध्ये (आरसीएफ) करण्यात आली आहे.

अपघातरोधक डबे-आरामदायी प्रवास

लिंफे हाँफमन बुश (एलएचबी) प्रकारातील डबे बसविण्यात येणार असून हे डबे अपघातरोधक असून त्यामुळे अपघातात कमी मनुष्यहानी होते. एलएचबी डब्यांची आसने आरामदायी असून डब्यांतील इंटेरियर तसेच प्रसाधनगृह आणि इतर सुविधा आधुनिक असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱयांनी दिली. आगामी काळात टप्प्याटप्याने सर्व एक्स्प्रेसचे डबे हे एलएचबी करण्यात येणार असल्याचेही या अधिकाऱयाने स्पष्ट केले.