दोरखंड तयार होते… जल्लाद हजर होता… पण…!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोरखंड तयार होते… जल्लाद हजर होता… आरोपींच्या वजनाइतक्या पुतळ्यांना फासावर लटकविण्याचा सरावदेखील झाला होता. पण पुन्हा एकदा न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत ‘निर्भया’ बलात्कार आणि हत्याकांडातील चारही दोषींच्या फाशीला स्थगिती दिली. आता आम्ही न्यायालयाच्या पुढील आदेशाची वाट पाहत आहोत, अशी प्रतिक्रिया तिहार कारागृहातील वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली.

मंगळवारी सकाळी सहा वाजता ‘निर्भया’च्या चारही दोषींना फासावर लटकविण्याची सर्व तयारी पूर्ण झाली होती, पण सोमवारी सायंकाळी न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत पुन्हा एकदा फाशीला स्थगिती दिली. फाशीला स्थगिती देताना अतिरिक्त सत्र न्यायाधीश धमेंद्र राणा यांनी सांगितले, ‘दोषी पवन गुप्ताने राष्ट्रपतींकडे केलेल्या दया याचिकेवर अद्याप निर्णय आलेला नाही. हा निर्णय येईपर्यंत आरोपींना फाशी देता येणार नसल्याचे न्यायाधीशांनी स्पष्ट केले. तिहार कारागृहात ‘निर्भया’ प्रकरणातील आरोपी मुकेशकुमार सिंह, विनोद कुमार शर्मा, अक्षयकुमार सिंह, पवनकुमार यांना मंगळवारी फाशी देण्यात येणार होती, मात्र फाशीला स्थगिती मिळाल्याने मेरठहून दिल्लीतील तिहार कारागृहात दाखल झालेला जल्लादही मंगळवारी दुपारी मेरठसाठी रवाना झाला.